मुंबई / प्रतिनिधी 7 July 2016
मुंबई महानगरपालिकेत रस्ते घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या रस्ते विभागाचे मुख्य अभियंता अशोक पवार आणि दक्षता विभागाचे प्रमुख उदय मुरुडकर या दोघाना पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांना कोर्टात हजार केले असता दोघांनाही ११ जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पालिकेतील दोन अधिकाऱ्यांना अटक केल्यावर आता रस्ते घोटाळा प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या २४ झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेत रस्ते घोटाळा उघड झाल्या नंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. ३४ रस्त्यांच्या कामांची चौकशी केली होती. त्यात महापालिकेचे दोन अधिकारी, सहा कंत्राटदार आणि थर्ड पार्टी ऑडिट करणार्या दोन सल्लागार कंपन्या दोषी आढळल्या होत्या. देशमुख समितीने हा प्राथमिक अहवाल दिला होता. त्यानंतर देशमुख समितीने २०७ रस्त्यांची तपासणी सुरू केली.
या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी करताना खाजगी लेखापाल कंपनीमधील १० लेखापालांना व कंत्राटदाराकडे साईट इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या १२ अभियंत्यांना अटक केली होती. याप्रकरणी अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना अटक होत नसल्याने प्रशासनावर टिका केली जात होती. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली व विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच पत्रकार जयश्री खाडिलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. लोकायुक्त आणि उच्च न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत पालिकेवर ताशेरे ओढत रस्ते घोटाळा प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारा प्रकरणी लाच लुचपत कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश मंगळवारी दिले होते. यानंतर दोनच दिवसात मुरुडकर व पवार या दोन्ही अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
No comments:
Post a Comment