मुंबई, दि. 22 : मुंबई महापालिकेतील काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून या कंत्राटदारांना यापुढे कोणतेही काम करता येणार नाही. तसेच या कंत्राटदारांना मुंबई महापालिकेने दिलेली काही कामे आधीच रद्द केलेली आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि सदर खड्डे बुजविण्यासाठी राज्य शासनामार्फत करण्यात आलेली कार्यवाही याबाबतची लक्षवेधी सूचना महाराष्ट्र विधान सभा नियम 105 अन्वये आज विधानसभेत उपस्थित करण्यात आली होती. विधानसभा सदस्य नितेश राणे, अजित पवार, अमित साटम, योगेश सागर, सुरेश प्रभू, पृथ्वीराज चव्हाण,ॲङ आशीष शेलार, ॲड.पराग अळवणी, अस्लम शेख, वर्षा गायकवाड यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.
या लक्षवेधीला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांचे काम ठराविक कंत्राटदारांनाच कसे मिळते याबाबत तपासणी करण्यात येत असून आतापर्यंत 235 रस्त्यांच्या कामांबाबतची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान दोषी असलेल्यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या चौकशी समितीमार्फत चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात सन 2013-14, सन 2014-15 आणि 2015-16 या कालावधीतील 5 कोटी रुपयांच्या 200 रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात येत असून सदर रस्त्यांची तांत्रिक तपासणी (ट्रायल पिटस) करण्यात आलेली असून याबाबत पुढील चौकशी करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे भरुन ते पूर्ववत करुन घेणे आणि रस्त्यांची देखभाल करुन ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्याबाबतची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 1,335 खड्डे शोधण्यात आले असून या खड्डयांची डागडुजीचे काम करण्यात येत आहे. आज वेगवेगळया कारणास्तव मुंबईतील रस्ते वेळोवेळी खणले जातात, त्यामुळे यापुढे रस्ते खोदण्यासाठी युटिलिटी कॅरिडॉर करता येईल का याबाबत विचार करण्यात येईल. खड्डे बुजविण्याकरिता नागपूरच्या अक्षय इनोव्हेशन कडून 12 टन माल मागविण्यात आला आहे का याबाबत माहिती घेण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या कामांबाबत करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत काही गंभीर अनियमितता आढळल्यामुळे मे. आर.पी.एस.इन्फ्राप्रोजेक्टस आणि के.आर.कन्स्ट्रक्शनस (जे.व्ही.) या कंत्राटदारांवर व अन्य रस्त्यांच्या कामांबाबत मे.रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस- आर.के.मधानी अँड कंपनी (जे.व्ही.), मे.के.आर.मधनी अँड कंपनी, मे. रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्टस लि., मे. महावीर रोडस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. तसेच जे.कुमार के.आर. कन्स्ट्रक्शनस (जे.व्ही.),यांच्याविरुध्द महानगरपालिकेमार्फत आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच या कंपनीबरोबर इंडियन रजिस्ट्रार ऑफ शिपिंग आणि एस.जी.एस.इंडिया प्रा.लि. या दोन त्रयस्थ लेखापरिक्षकांविरुध्दही एफआयआर नोंदविण्यात आला आहे. या 6 ठेकेदारांनी 34 रस्त्यांमध्ये केलेल्या कामांबाबतचा अहवाल तपासणी करुन कार्यवाही करण्यात येईल. या प्रकरणात आतापर्यंत 2 मुख्य अभियंत्यांना निलंबित करुन अटक करण्यात आलेली आहे. तसेच या प्रकरणात 2 कार्यकारी अभियंत्यांना महानगरपालिकेमार्फत निलंबित करण्यात आलेले आहे. निलंबित करण्यात आलेले 2 कार्यकारी अभियंता व महानगरपालिकेच्या सेवेतील 4 दुय्यम अभियंत्याविरुध्द विभागीय चौकशीची कारवाई करण्यात येत असल्याचे डॉ. पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अख्त्यारितील रस्त्यांची देखभाल महानगरपालिकेमार्फत करण्यात येते. रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्त्यांची देखभाल करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 24 विभागांमध्ये रस्ते अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेच्या संबंधित विभागांच्या रस्त्यांवरील खड्डे भरुन रस्त्यांची देखभाल करणे व चर भरण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटदारांकडून सदर कामांची अंमलबजावणी करण्याचे काम महानगरपालिकेच्या विभागपातळीवर केली जाते. जून 2016 पासून आजमितीपर्यंत रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम महानगरपालिकेच्या विभागस्तरावर व प्रकल्प रस्त्यांवरील रस्ते विभागाच्या अभियंत्यांच्या देखरेखीखाली युध्दपातळीवर सुरु असून महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे भरुन पूर्ववत करुन घेण्यात येत आहेत.घाटकोपर-साकीनाका-अंधेरी हा मेट्रो खालील जोड रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. सदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
याशिवाय मिठी नदीपासून घाटकोपर पर्यंतच्या अंधेरी- घाटकोपर जोडरस्त्याची निविदा प्रक्रियाही प्रगतीपथावर आहे. महाकाली गुंफामार्गापासून ते अंधेरी पूर्व रेल्वे स्थानकापर्यंत (अंधेरी-कुर्ला जोडरस्ता) मेट्रो रेल्वेखालील रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही करण्यात येत आहे. याशिवाय विविध रस्त्यांवरील खड्डे आणि चर भरण्याची कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. सन 2013-14 या वर्षात बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 671 कोटी, सन 2014-15 या वर्षात बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 2,059 कोटी आणि 2015-16 या वर्षात बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 1,633 कोटी रुपये रस्त्यांच्या डागडुजीसाठी खर्च करण्यात आले आहेत. रस्त्यांच्या डागडुजीसाठी 2016-17 या वर्षासाठी 2,884 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्यांवरील स्पीड ब्रेकरची तत्काळ दुरुस्ती करणे, खड्डे बुजविण्याचे कामे यांना प्राधान्य देण्यात येईल. असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment