मुंबई / प्रतिनिधी 12 July 2016
आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू असलेले आंबेडकर भवन पाडल्याने आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. ठीक ठिकाणी हा संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलने आणि निदर्शने होत असल्याने जो पर्यंत आंबेडकर भवनचा वाद मिटत नाही तो पर्यंत नव्या बांधकामाला मुंबई महानगरपालिकेने स्थगिती द्यावी असे निर्देश मुंबईच्या महापौर आंबेकर यांनी दिले. या संदर्भात पालिका आयुक्तांना पत्र देणार असल्याचे आंबेकर यांनी पत्रकारांना सांगितले. आंबेडकर भवनबाबत राज्य सरकारने लवकरात लवकर पाऊले उचलण्याचे आवाहन आंबेकर यांनी यावेळी केले.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासह शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्हे, मुंबई महानगरपालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसला भेट देऊन या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक वास्तूच्या केलेल्या नासधुसीची पाहणी केली. यावेळी महापौर म्हणाल्या की, आंबेडकर भवनला पालिकेने धोकादायक इमारत म्हणून नोटीस बजावली होती हे खरे आहे, परंतू या वास्तूवर झालेली कारवाई चुकीची आहे. इमारत तोडताना पालिकेचे कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. बांधकाम वा कुठलीही वास्तू पाडण्याची कारवाई करायची असल्यास इमारतीमधील भाडेकरू व ऑक्युपट्स या सर्वांना पर्यायी जागा द्याव्या लागतात. वीज, पाणी खंडित करावे लागते. जमीनदोस्त करण्याचा आराखडा व त्याचे टप्पे द्यावे लागतात तसेच पालिका अधिकार्यांच्या देखरेखीखाली हे काम केले जाते. या सर्व नियमांचे इम्पू्रव्हमेंट ट्रस्टच्या प्रतिनिधींनी उल्लंघन केले असल्याचे महापौर म्हणाल्या.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांची बुद्धभू षण प्रिंटिंग प्रेस विध्वंस करायची आवश्यकता नव्हती. प्रेस व त्यातील वस्तूंची काळजी घेऊन जातं करायला हवी होती. राष्ट्रीय ठेवा असलेल्या वस्तूंचे नासधूस कारण्यात आली आहे. बाबासाहेब ज्या लंडन येथील घरात राहिले त्या घराचे स्मारक म्हणून आपण जपणूक करतो, पण ऐतिहासिक प्रेसकडे दुर्लक्ष करणे योग्य नसल्याचे आंबेकर म्हणाल्या. दादर या ठिकाणी १७ मजली इमारत बांधण्यास परवानगी नसल्याने पालिकेने कोणत्या आधारावर १७ माळ्याची परवानगी दिली याची चौकशी करण्याचे निर्देश आंबेकर यांनी यावेळी दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नसल्याचे खंत आमदार नीलम गोर्हे यांनी व्यक्त केली. १८ जुलैपासून सुरू होणार्या अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे व सर्वाना मान्य असेल त्या तोडग्याच्या बाजूने शिवसेना असेल असे आश्वासन गोर्हे यांनी सांगितले. यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसचे भीमराव आंबेडकर, रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे, रिपब्लिकन सेनेचे काशीनाथ निकाळजे, रमेश जाधव, स्थानिक नगरसेविका अलका डोके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment