मुंबई, दि. 5 : तूरडाळीचे दर नियंत्रीत ठेवण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्यांनी सर्व दर्जाच्या तूरडाळींची विक्री बाजारात करावी. अन्यथा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी आज येथे सांगितले.
राज्यातील तूरडाळीचे दर नियंत्रीत करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजारातील तूरडाळीच्या दरांचा आढावा घेताना बापट बोलत होते. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्यासह दी बॉम्बे ग्रेन डिलर्स, दी रिटेल ग्रेन डिलर्स फेडरेशन, खाद्यतेल व्यापारी असोसिएशन, ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर संघ, बॉम्बे शुगर व्यापार असोसिएशनचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापट म्हणाले की, राज्यातील सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात किरकोळ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात सर्व दर्जाचे व रास्त दर असलेली तूरडाळ विक्रीसाठी उपलब्ध कराव्यात. जेणेकरून सर्वसामान्य ग्राहकांना रास्त दरात डाळ मिळू शकेल.
प्रधान सचिव पाठक म्हणाले की, संपूर्ण देशातील बाजारातील तूरडाळीचे घाऊक व किरकोळ दरांची माहिती घेऊन बाजारात कोणत्या तूरडाळी उपलब्ध आहेत, याचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यावेळी किरकोळ बाजारात जास्त नफा घेऊन डाळींची विक्री करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांनी योग्य नफा कमवून ग्राहकांना रास्त दरात तूरडाळ उपलब्ध करून द्यावी. जास्त नफा मिळविण्यासाठी दर वाढविल्यास कारवाई करण्यात येईल.
No comments:
Post a Comment