मुंबई / प्रतिनिधी २८ जुलै २०१६
बृहन्मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होणार असून निवडणूकीत मुंबईकर नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी राबविण्यात येत असलेल्या मतदार जागृती अभियानांतर्गत कल्पक सूचनात्मक लेख, घोषवाक्य, चित्रकला आणि मायक्रो फिल्मस् (जिंगल्स) अशा विविध प्रकारच्या खुल्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईकर नागरिकांकडून मतदार जागृती अभियानाबाबतच्या उपरोक्त चार विषयावरील सीडी किंवा अन्य स्वरुपातील साहित्य गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट २०१६ या एकाच दिवशी सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० या कार्यालयीन वेळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयातंर्गत येत असलेल्या ठराविक शाळांमध्ये स्वीकारल्या जातील.प्रत्येक विषयानुरुप निवड झालेल्या पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. त्यासोबतच कल्पक सूचना लेखन स्पर्धेचेसुध्दा आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे – शंभर टक्के मतदार नोंदणी, भरघोस मतदान – स्वयंस्फूर्त मतदान, निर्भय मतदान – पारदर्शी मतदान, प्रभावी आचरण – प्रभावी मतदान, स्वच्छ उमेदवार- स्वच्छ मतदार हे विषय आहे.
केवळ महानगरपालिका निवडणूकीसंदर्भात ही स्पर्धा असून या सूचना मुद्देसुद, व्यवहार्य व २५० शब्दांच्या आत असाव्यात. तज्ज्ञ परिक्षकांच्या पॅनलव्दारे त्यांचे परिक्षण करण्यात येऊन उत्कृष्ट सूचना पाठविणाऱयांना प्रत्येक विषयासाठी तीन स्वतंत्र प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमाकांची बक्षिसे दिली जातील. एकापेक्षा जास्त विषयांवर सूचना पाठविता येतील, परंतु प्रत्येक विषयांच्या सूचना स्वंतत्ररित्या पाठविणे आवश्यक आहे. सदर सूचना हया दिनांक ४ ऑगस्ट २०१६ या एकाच दिवशी पालिकेने नेमून दिलेल्या शाळांच्या पत्यांवर स्विकारण्यात येतील. सर्व वयोगटातील नागरिकांनी या सर्व स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment