३० जुलै पासून आंबेडकर भवन श्रमदानातून पुन्हा उभे करू - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 July 2016

३० जुलै पासून आंबेडकर भवन श्रमदानातून पुन्हा उभे करू - प्रकाश आंबेडकर

संसद आणि विधिमंडळ पाडणार का ? - कनैयाकुमार 
४ तास रास्ता रोको 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू असलेले दादर येथील आंबेडकर भवन पाडल्यानंतर जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पसलरी आहे. यामुळे आंबेडकर भवन पुन्हा श्रमदानातून उभे करू. येत्या ३० जुलै पासून श्रमदानातून हे केंद्र उभे करण्याचे काम सुरू केले जाणार असून यावेळी श्रमदानासाठी आंबेडकरी जनतेने यावे असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

आंबेडकर भवन पाडल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात रत्नाकर गायकवाड आणि ट्रस्टी विरोधात गुन्हा दाखल करूनही त्यांना अटक केली जात नसल्याने मुंबईच्या भायखळा येथील राणीबाग पासून विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे येताच पोलिसांनी अडवला यामुळे मोर्चेकरानी रस्त्यावरच उभे राहून आझाद मैदानात सभा घेण्याचे पोलिसांचे आवाहन धुडकावून लावले. यावेळी बोलताना ज्या व्यवस्थे विरोधात बाबासाहेबानी लढाईत आपली हयात घालवली आज तीच व्यवस्था कार्यरत झाली आहे. पुन्हा उलटी पाऊले सुरू झाल्याने लोकांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आंबेडकर म्हणाले. 

आज केंद्र सरकारने कामगार असो व इतर कायदे असो यामध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक सुरक्षितता काढली गेली आहे असे सरकारने का केले याचा खुलासा मोदी यांनी करावा असे आव्हान आंबेडकर यांनी यावेळी केले. आंबेडकर भवन विचार परिवर्तनाचे केंद्र होते. अनेक सामाजिक लढ्याची सुरुवात या ठिकाणाहून करण्यात आली होती. सध्या केंद्रातील सरकार आणि सहभागी संघटनाकडून पुढच्या १० वर्षाच्या अजन्ड्याची तयारी सुरू असल्यानेच आंबेडकर भवन तोडल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.मोहन भागवत यांनी ओव्हलच्या मैदानात समोर समोर चर्चेला यावे असे आवाहन करताना आज या मोर्चामधून जी ज्योत पेटली आहे ही ज्योत २०१९ पर्यंत पेटतच ठेवावी लागेल असे आंबेडकर म्हणाले. 

यावेळी मोर्चामध्ये रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बुद्धभूषण प्रेसचे भीमराव आंबेडकर, सीपीआयचे भालचंद्र कांगो, खासदार सीताराम येचुरी, साहित्यिक ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, किशोर ढमाले, काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, रिपब्लिकन पक्षाचे सुनील खांबे, रिपब्लिकन खरात गटाचे सचिन खरात, एमआयएम पक्षाचे आमदार वारीस पठाण, आमदार इम्तियाज जलील, इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

संसद आणि विधिमंडळ पाडणार का ? - कनैयाकुमार 
आंबेडकरी चळवळीचे आणि बुद्धिजम ज्या ठिकाणाहून पसरवला जात होता असे केंद्र आंबेडकर भवन होते. राष्ट्रपुरुष असलेल्या बाबासाहेबांच्या सहवास ज्या जागेमध्ये होता त्या ठिकाणचे आंबेडकर भवन पाडले गेले. ट्रस्टींमध्ये वाद असल्याचे बोलले जात आहे. वाद हे विधिमंडळ आणि संसदेमध्ये पण होतात मग संसद आणि विधानभवन पाडणार का असा प्रश्न दिल्लीच्या जेएनयु विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कनैयाकुमार याने उपस्थित केला. 

हा मोर्चा ज्या ठिकाणी आहे याच ठिकाणी छत्रपती शिवसजी टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आहे हे जुने झाले म्हणून पाडून या ठिकाणी १७ ते २० माजली इमारत उभी राहू शकत नाही प्रत्येक वास्तूचे वेगळे असे महत्व असते तसेच आंबेडकर भवनचे वेगळे असे महत्व असल्याने ते भवन पाडून त्या ठिकाणी १७ मजल्याची इमारत उभारलीच जाऊ शकत नाही असे कनैयाकुमार म्हणाला, आंबेडकर भवन मध्ये रोहित वेमुलाच्या कुटुंबीयांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली होती, आंबेडकर भवनातून बुद्धिजमचा प्रसार केला जात होता हेच येथील मनुवादी लोकांना नको असल्याने आंबेडकर भवन पाडून हे केंद्र बंद करण्याचा कारस्थान रचले गेले आहे, सरकारने अधिकारी यामध्ये सामील असले तरी अधिकाऱ्यांना याची ढाल करून पुढे न करता आंबेडकर भवन पाडल्याची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि भाजपाने माफी मागावी अशी मागणी कनैयाकुमार याने केली. भाजपा आणि आरएसएसवाल्याना समरसता आणायची आहे, ही समरसता समानतेशिवाय येऊच शकत नाही असे कनैयाकुमार याने यावेळी ठणकावून सांगितले.  

केंद्राचे आश्वासन  
संसदेमध्ये आंबेडकर भवन पाडल्या प्रकरणी आवाज उचलून सरकारला धारेवर धरले असता सरकाने राज्य सरकार आणि महानगरपालिकेशी चर्चा करून पुन्हा आंबेडकर भवन उभे करण्याचे तसेच बाबासाहेबांच्या राष्ट्रीय ठेव्याचे जातं करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती सीपीआयचे खासदार सीताराम येचुरी यांनी मोर्चेकरांना दिले. 

शिवसेना आवाज उचलणार 
आंबेडकर भवन पाडल्यानंतर त्या ठिकाणी भेट दिली असता या ठिकाणी राष्ट्रीय ठेवा म्हणून जातं करायला हव्यात असल्या वस्तूंची नासधूस करण्यात आल्याचे दिसले. ही गंभीर बाब आहे. याप्रकरणी अधिवेशनात प्रश्न मांडला जाणार असून दोषी लोकांवर कारवाई व्हावी म्हणून पाठपुरावा केला जाईल. शिवसेना पक्ष आंबेडकर भवन प्रकरणी आंबेडकरी जाणते सोबत आहे असे आश्वासन यावेळी आमदार निलम गोऱ्हे यांनी दिले. 

४ तास रास्ता रोको 
भायखळ्याच्या राणीबाग येथून निघालेला मोर्चा छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे येताच पोलिसांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अडवला. पोलीस मोर्चेकऱ्यांना आझाद मैदानात जाण्याचे आवाहन करत होते. पोलिसांचे हे आवाहन संतप्त मोर्चेकऱ्यांनी धुडकावून लावले. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे दुपारी एक वाजल्यापासून मोर्चेकरी जमले होते. राणीबागकडून येणारे मोर्चेकरी या ठिकाणी येताच रस्त्यावरच सभा सुरू करण्यात आली. ही सभा जवळपास ३ तास चालली. सायंकाळी ५ वाजता मोर्चा संपल्याची घोषणा केल्यानंतरही जवळपास अर्धा तास वाहतूक या मार्गे सुरू करण्यात आली नव्हती.  





No comments:

Post a Comment

Post Bottom Ad