मुंबई, दि. 28 : मुंबई एअरपोर्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळ तातडीने बरखास्त करुन त्यावर प्रशासक नेमण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य सुधाकर देशमुख यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना सहकार मंत्री म्हणाले की, या संस्थेची स्थापना झाल्यापासून निवडणूक न झाल्याबाबत तसेच संस्थेच्या गैरकामकाजाबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल झाली आहे. त्या अनुषंगाने सहायक निंबधकांनी सुनावणी घेतली असता संस्थेच्या दप्तराची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तपासणी करण्यात आली. त्यात संस्थेबद्दल करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने सहायक निबंधकांनी संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून लेखा परिक्षकांची नियुक्ती केली आहे. या आदेशासंदर्भात विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले असून त्यांनी सहायक निबंधकांच्या आदेशास स्थगिती दिली आहे.
या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करुन त्याची चौकशी केली जाईल. चौकशीत संचालक दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या ठिकाणी असलेल्या संघटनेच्या कार्यालयाचे स्थलांतर देखील करण्यात येईल, असे सहकार मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment