मुंबई ७ जुलै २०१६ - बृहन्मुंबई क्षेत्रातील रस्ते आणि वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असणाऱया सर्व प्राधिकरणांची संयुक्त बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित करण्याची मागणी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी एका पत्राद्वारे केली आहे.
पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गाच्या अनेक रस्त्यांची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे येत नाही. तथापि, या महामार्गावरील रस्त्यांवरील खड्डय़ांची समस्या सध्या निर्माण झाली आहे. या महामार्गाचे व्यवस्थापन पाहणाऱया संस्था या राज्य शासनाच्या अखत्यारित असल्याने त्या संस्थांनी रस्त्यांवरील खड्डय़ांच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष घालावे, असे महापौरांनी पत्रात नमूद केले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारित येतात.
महापौरांनी आपल्या पत्रात पुढे असेही नमूद केले आहे की, महापालिकेने गेल्या तीन वर्षात जवळपास १५०० रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे केली आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याखाली असलेल्या पर्जन्य जलवाहिन्या, पाण्याच्या पाईपलाईन दर्जा सुधारण्यात आला आहे. तसेच मुंबई ही महानगरी असल्याने पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतरही रस्त्यांची कामेही सातत्याने सुरु असतात, येत्या दोन वर्षांत रस्त्यासंबंधी ९५ टक्के कामे पूर्ण करु, असा विश्वासही महापौरांनी आपल्या पत्रात व्यक्त केला आहे.
मुंबईतील रस्त्यांची जबाबदारी असलेल्या सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक आपण आयोजित करावी, असे महापौरांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात नमूद केले असून वाहतूक व्यवस्थापनासाठी वाहतूक विभाग तसेच रेल्वे यंत्रणेलाही या बैठकीस उपस्थित राहण्यासंदर्भात निर्देश देण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment