मुंबई दि. १९ : शैक्षणिक प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या नॉनक्रिमिलेअरसाठीची उत्पन्न मर्यादा अधिवेशन संपण्यापूर्वी साडेचार लाखावरून सहा लाख एवढी करण्यात येईल,तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती झाली नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी प्रवेश देण्यात यावेत अशा सूचना संबंधित महाविद्यालयास देण्यात येतील असे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, तसेच शिक्षण फी व परीक्षा फी प्रतिपूर्ती योजनेसंदर्भात लक्षवेधी विधानसभा सदस्य एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड यांनी मांडली. त्यास उत्तर देताना बडोले बोलत होते.
बडोले पुढे म्हणाले की, सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करणे शक्य झाले नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रतिपूर्ती झाली नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात यावेत अशा सूचना संबंधित महाविद्यालयाला देण्यात येणार आहेत. संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही बडोले यांनी यावेळी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.
तसेच या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क २०१६-१७ मध्ये मंजूर निधीतून प्राधान्याने अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याचबरोबर द्वितीय व तृतीय वर्षासाठी शिकत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ऑनलाईन सेवा पुरविणारी मास टेक कंपनी यासंदर्भात दोषी असल्यास त्याची चौकशी करून कारवाई करू असेही बडोले यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment