मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षी जून महिन्यात पावसामुळे बेस्टच्या विविध मार्गिकांमध्ये करण्यात आलेल्या तात्पुरत्या बदलांचा एकूण कालावधी हा २ हजार ६५० मिनीटे म्हणजेच ४४ तास १० मिनीटे एवढा होता. तर या वर्षी जून महिन्यात बेस्ट बसेसच्या मार्गिकांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आलेल्या बदलांचा एकूण कालावधी हा केवळ २ तास ५० मिनीटे इतका होता. या वर्षी नालेसफाईची कामे अधिक प्रभावीपणे करण्यात आल्याने बेस्ट मार्गिका बदलांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ९४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जून महिन्यात एलफिन्स्टन पूलाजवळील परिसर, गांधी मार्केट (किंग्जसर्कल), शीव (सायन) परिसरातील मार्ग क्र. २४, कुर्ला परिसरातील शेल कॉलनी मार्ग, हिंदमाता परिसर, मिलन सबवे, पिटवाल मार्ग, सयानी रोड, परळ एस.टी. डेपो,स्वामी विवेकानंद मार्ग, दादर ट्राम टर्मिनस परिसर, टी. टी., दादर वर्कशॉप, सुंदर विहार, प्रतिक्षा नगर, मडके बुवा चौक, परळ ट्राम टर्मिनस परिसर इत्यादी परिसरातून जाणा-या बेस्ट बसचे मार्ग तात्पुरत्या स्वरुपात बदलविण्यात आले होते. या बदलांचा एकूण कालावधी हा ४४ तास १० मिनीटे एवढा होता.
तर यावर्षी जून महिन्यात शीव (सायन) परिसरातील मार्ग क्र. २४ व हिंदमाता या परिसरात काही काळ पाण्याचा निचरा होण्यास अडचण आल्याने या दोन परिसरातून जाणा-या बेस्ट बसेसचे मार्ग तात्पुरत्या स्वरुपात बदलविण्यात आले होते. या बदलांचा एकूण कालावधी हा केवळ २ तास ५० मिनीटे एवढा होता. याचाच अर्थ गेल्यावर्षीच्या तुलनेत बेस्ट मार्गिेकांच्या तात्पुरत्या बदलांच्या कालावधीमध्ये सुमारे ९४ टक्क्यांची घट झाली आहे.
गेल्यावर्षी जून महिन्यात ९८९.४० मि.मि. एवढा पाऊस पडला होता. तर यावर्षी जून महिन्यात ७४४.६० मि.मि. इतका पाऊस नोंदविण्यात आला आहे. याचाच अर्थ गेल्यावर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यावर्षीच्या जून महिन्यात २४.७५ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. तर बेस्ट मार्गिकांच्या तात्पुरत्या स्वरुपातील बदलांच्या कालावधीमध्ये सुमारे ९४ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment