मुंबई, दि. 21 : राज्यातील बालगृहांच्या तपासणी संदर्भातील संपूर्ण अहवाल येत्या हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील सिडको येथील सुनिता बालगृहातून एका बालकाच्या झालेल्या विक्री संदर्भातला प्रश्न विधानसभा सदस्य प्रा.वर्षा गायकवाड, राधाकृष्ण विखे-पाटील, डॉ. जयप्रकाश मुंदडा, भारती लव्हेकर यांनी उपस्थित केला होता.
मुंडे या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाल्या की, राज्यातील बालगृहांची तपासणी महिला व बालविकास आयुक्त यांच्यामार्फत करण्यात येत आहे. यामध्ये बालगृहांची सद्य:स्थिती, आवश्यक असणाऱ्या बाबींचा समावेश आहे. शासनाने राज्यातील बालगृहे बंद करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बालगृहांमध्ये नियमबाह्य मुलांना प्रवेश देण्यात आले असतील तर त्या मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. याशिवाय शिशुगृह, बालगृहातील मुलांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सुनिता बालगृह या खाजगी संस्थेच्या तत्कालीन अधीक्षिका सत्यश्री खाडे यांच्यावर बालकाची विक्री केल्याचा गुन्हा ताडदेव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. कोणत्याही बालगृहातून मूल चोरीला जाऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्रीय दत्तक स्त्रोत प्राधिकरणाकडून दत्तकासंबंधीच्या सर्व प्रक्रियांचे नियमन केले जाते. या प्राधिकरणाने सर्व दत्तक प्रकरणांची दत्तकेच्छुक पालकांची व दत्तकास योग्य बालके या सर्वांची नोंद CARINGS या संकेतस्थळावर करणे बंधनकारक केले आहे. याशिवाय राज्यात कार्यरत असलेल्या 63 विशेष दत्तक संस्थांची तपासणी महिला व बालविकास आयुक्तांमार्फत करण्यात येत असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment