मुंबई, दि. 25 : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत मोफत सेवेत थॅलेसेमिया आजाराच्या चाचणीचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा रुग्णालय, ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती या ठिकाणी ‘डे-केअर सेंटर’ अंतर्गत हिमोफेलिया, थॅलेसेमिया, सिकलसेल, ॲनिमिया या आजारांवर प्रतिबंधात्मक उपचार देण्यात येत आहेत, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
मुंबईत थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांमध्ये वाढ होत असल्याबाबत सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना सावंत बोलत होते. सावंत म्हणाले की, सन 2016-17 च्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये जिल्हा रुग्णालय अहमदनगर, पुणे, नागपूर, औरंगाबाद या केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून तेथे गरोदर मातांची व बालकांची चाचणी करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींची चाचणी आणि थॅलेसेमिया आजाराबाबत जनतेत जनजागृती निर्माण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबईत केईएम रुग्णालय आणि पुणे येथील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचाराची सुविधा उपलब्ध असून रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन करण्यात येते, असेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment