मुंबई / अजेयकुमार जाधव 27 july 2016
बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस व आंबेडकर भवन या ऐतिहासिक वास्तूं पाडल्याचा निषेध करत या वास्तूंचे संवर्धन विना विलंब करावे. दलित शोषित व वंचित उपेक्षित अश्या भारतीय जनतेचे श्रद्धास्थान उद्ध्वस्त करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करावी. ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी आंबेडकर भवन व बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसची जैसेथे उभारणी करावी अश्या मागण्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केल्या. मुंबईच्या आझाद मैदानांत आयोजित मोर्चा प्रसंगी कवाडे बोलत होते. यावेळी मोर्चामध्ये जयदीप कवाडे, एड. जे के नारायणे, गोपाळराव आटोटे, मिलिंद सुर्वे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कवाडे यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून अनुसूचित जाती जमाती व बौद्धांवर अन्याय अत्याचारात वाढ झाली आहे. खैरलांजी, सोनाई, खर्डा, जवखेडा येथे बौद्ध व दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्या तरी दलितांच्या सुरक्षेबाबत शासन गंभीर नसल्याचा आरोप कवाडे यांनी यावेळी केला. नवी मुंबई येथील स्वप्नील सोनावणे या १५ वर्षीय नाव युवकाचा त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यादेखत खून करण्यात आला. नेरुळ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक माने, राजगुरू यांच्या चिथावणी आणि संगनमताने खून करण्यात आला असल्याने या प्रकरणी या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे, तसेच हि केस ऍट्रॉसिटी कायद्यानुकसार विशेष न्यायालयात चालवून गुन्हेगारांना शिक्षा द्यावी अशी मागणी कवाडे यांनी केली.
शासन प्रशासनातील व पोलिसांच्या भेदभावामुळे दलित आणि बौद्ध समाजात असुरक्षेतेची व असहाय्यतेचा भावना निर्माण झाली आहे. यामुळे भयमुक्त जीवन जगण्यासाठी दलित आणि बौद्धांना स्वसंरक्षणासाठी शस्त्रसज्ज करण्यासाठी शासनाने गंभीर पाऊले उचलावी. राज्यातील शेतकरी नैराश्यापोटी आत्महत्या करत असल्याने त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी कर्जमुक्त करावे. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. अनुसूचित जाती जमाती, ओबीसी विद्यार्थ्यांना फ्रीशिप व शिष्यवृत्ती रक्कम वेळेत मिळण्यासाठी सरकारने कारवाई करावी, अनुसूचित जाती जमाती विद्यार्थ्यांच्या वार्षिक उप्पनाची मर्यादा आठ लाख रुपयांपर्यंत वाढवावी, मुस्लिम समाजातीळ विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा, शासकीय सेवेतील मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढावा, झोपडी धारकांना व भूमिहीन शेतमजुरांना अतिक्रमण जमिनीचे पट्टे मालकी हक्काने द्यावेत इत्यादी मागण्या कवाडे यांनी यावेळी केली.
No comments:
Post a Comment