मुंबई – राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या खासगी वाहनाला लाल दिवा बसवून घेतला असून, ते बेकायदेशीर असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा-मेनन यांनी केला आहे.
राज्यातील कुठल्याही मंत्र्याकडे असणाऱ्या कारपैकी रेंज रोव्हर ही सर्वात महागडी कार आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे ही महाग कार आहे. परंतु, त्या कर भरू शकत नाहीत. त्यांच्या रेंज रोव्हरचा आरटीओ क्रमांक DL 12 CD 1212 आहे. ज्याला राज्य शासनाचा लाल दिवा बसविण्यात आलेला आहे. या कारची नोंदणी दिल्ली येथे रॅडिको एन व्ही डिस्टीलरीस या नावाने आहे. पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे या कंपनीचे संचालक आहेत.
दिल्लीत नोंदणी असलेली कार इतर राज्यात घेऊन जात असताना राज्य बदलीची एनओसी द्यावी लागते. मात्र, दिल्ली वाहतूक शाखेकडे अशाप्रकारची कुठलीही एनओसी देण्यात आली नाही. किंबहुना एनओसीसाठी साधा अर्जही करण्यात आला नसल्याचा आरोप प्रिती शर्मा-मेनन यांनी केला आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने राज्य वाहतूक आयुक्त श्याम वर्धने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रार केलेली आहे.
No comments:
Post a Comment