नागपूर, दि. २८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बार्टी) चे विदर्भासाठी खास उपकेंद्र तयार होणार आहे. समता प्रतिष्ठान नावाने स्थापन होणाऱ्या या केंद्राचा प्रस्ताव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून आला आहे. बार्टीच्या पुणे येथील केंद्राप्रमाणे विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी सर्व उपक्रम येथून राबविण्यात येणार आहेत. यासाठी ५० कोटीच्या जवळपास खर्च येणार असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बार्टी कौशल्याविकास, संशोधन, प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण उपक्रम राबविते. परंतु यासाठी बार्टीच्या पुणे येथील केंद्राकडे अप्रोच व्हावे लागते. विदर्भात मोठ्या संख्येने समाजसुधारकांवर संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. बार्टीच्या विविध उपक्रमांचा विदर्भातील विद्यार्थी लाभ घेत आहे. त्यामुळे विदर्भातच बार्टीचे उपकेंद्र सुरू करण्याचा विचार आहे. विदर्भ हे दलित चळवळीचे प्रेरणास्थान असतानाही येथे दलित रंगभूमीची चळवळ फार प्रभावी ठरू शकली नाही. दलित रंगभूमीला अप्रत्यक्षरीत्या बळ देण्याचा बार्टीचा प्रयत्न आहे.
बार्टीच्या माध्यमातून सांस्कृतिकदृष्ट्या राबविण्यात येणाऱ्या अभियानात दलित रंगभूमीला संधी देण्याचा बार्टीचा प्रयत्न आहे. बार्टीकडे महाड स्मारकाची जबाबदारी आली आहे. येथे फाईव्हस्टार निवासी संशोधन केंद्र सुरू करण्याचा तसेच महाड स्मारकाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्याचा बार्टीचा मानस आहे. त्यावर जवळपास आठ कोटीचा खर्च होणार आहे. बार्टीतर्फे अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित महिलांवर संशोधन करण्यात येणार आहे.
शिक्षणाचा या महिलांना काय फायदा झाला, त्यांचा विकास झाला का याचा डाटा गोळा करणार आहे. त्याचबरोबर घरकामगार महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट पुणे येथे सुरू आहे. पुढच्या वर्षात जवळपास १० हजार महिलांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे राजेश ढाबरे यावेळी म्हणाले
No comments:
Post a Comment