युनिसेफ व इतर संस्थांच्या सहकार्याने'शिशुपोषण' ऍप तयार
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त २ ऑगस्ट रोजी होणार लोकार्पण
मुंबई - आई होणे म्हणजे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील सर्वात मोठा 'आनंद क्षण' ! गर्भवती महिला असो किंवा नवजात शिशुची आई, प्रत्येकीला आपल्या बाळाचे आरोग्य सुदृढ व चांगले असावे अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या संबंधित माहितीचा वापर होऊ शकतो. मात्र, ही माहिती शास्त्रशुद्ध असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टर्स व संबंधित क्षेत्रात काम करणा-या संस्थांनी गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांना शास्त्रशुद्ध माहिती देणारे एक बहुपयोगी ऍन्ड्रॉईड ऍप तयार केले आहे, अशी माहिती केईएम रुग्णालयाच्या जनऔषधशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ.कामाक्षी भाटे यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महापालिकेच्या रा. ए. स्मा. (केईएम) रुग्णालय व सेठ गो.सुं. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पुढाकाराने तसेच युनिसेफ (युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड), ब्रेस्टफीडींग प्रमोशन्स नेटवर्क ऑफ इंडिया आणि मुंबई ब्रेस्टफीडींग प्रमोशन कमिटी यांच्या सहकार्याने गर्भवती आणि स्तनदा माता यांना अतिशय उपयोगी ठरेल असे 'शिशुपोषण' (ShishuPoshan) हे ऍन्ड्रॉईड ऍप तयार करण्यात आले आहे. येत्या २ ऑगस्ट रोजी जागतिक स्तनपान सप्ताहाच्या शुभारंभ कार्यक्रमात या ऍपचे लोकार्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जुहू पसिरातील'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. आर.एन. कूपर रुग्णालयामध्ये दि. २ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त लोकार्पित करण्यात येणा-या'शिशुपोषण' या ऍन्ड्रॉईड ऍप बद्दल महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहेः
- आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी सर्व पोषकतत्वे सुयोग्य प्रमाणात असतात. त्यामुळे बाळ जन्मल्यापासून ते सहा महिन्यांचे होईपर्यंत निव्वळ स्तनपान देण्याची गरज असते. तसेच पाणी देण्याची आवश्यकता नसते.आईचे दूध योग्य प्रमाणात मिळाल्यास ते मूल अधिक निरोगी व हुशार होते. या बाबी लक्षात घेऊन 'शिशुपोषण' हे माहितीपूर्ण ऍप तयार करण्यात आले आहे.
- या ऍपवर उपलब्ध करुन देण्यात येणारी माहिती ही हिंदी,मराठी व इंग्रजी अशा तिन्हीं भाषांमध्ये उपलब्ध आहे.
- बाळाला स्तनपान कसे द्यावे ? ते देतांना कोणती काळजी घ्यावी ? स्तनपानाच्या दृष्टीने कोणया गोष्टी महत्त्वाच आहेत? स्तनपानाने मुलांच्या आरोग्याला कसा व कोणता उपयोग होतो ? तसेच कामकाजी महिलांनी स्तनपान कसे सुरु ठेवावे ?यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे साध्या सोप्या भाषेत या ऍपवर उपलब्ध आहेत.
- बाळाची सुयोग्य व निकोप वाढ होण्यासाठी सर्वसाधारण काळजी काय घ्यावी ? मातेचा आहार कसा असावा ? पूरक आहार आणि पोषण म्हणजे काय ? यासारख्या आई व बाळाशी संबंधित असणा-या विविध बाबींवर शास्त्रशुद्ध माहिती या ऍपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
- 'ShishuPoshan' हे ऍन्ड्रॉईड ऍप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर'ShishuPoshan' या नावाने सर्च करुन हे ऍप आपल्या ऍन्ड्रॉईड स्मार्ट फोनवर सहजपणे डाऊनलोड व इन्स्टॉल करता येणार आहे.
No comments:
Post a Comment