मुंबई 3 july 2016 - दूषित पाण्यामुळे साथींच्या आजाराचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे पावसाळ्यापूर्वी मुंबई महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. दूषित पाणी आढळल्यास तत्काळ पालिकेच्या वॉर्ड ऑफिसला कळवा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे.
अस्वच्छ पाण्याच्या सेवनामुळे व पाण्याच्या संपर्कात आल्याने मुंबईत अनेक जण साथींच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. यात लेप्टो, गॅस्ट्रो, मलेरिया व हेपेटायटिस या आजारांचा समावेश आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये जून महिन्यात गॅस्ट्रोचे ९७९, मलेरियाचे ४८२, कावीळचे १६६, डेंग्यूचे १५३ आणि कॉलराचा एक रुग्ण आढळला आहे. ही रुग्णांची आकडेवारी केवळ पालिका रुग्णालयांतील आहे. खासगी रुग्णालयांतील रुग्णांची संख्या पाहिली तर ही संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.
हे आजार दूषित पाण्यामुळे पसरणारे असल्याने रुग्णसंख्येत दरवर्षी प्रचंड वाढ पाहायला मिळते. यामुळे यंदाच्या वर्षी पालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच मुंबईतील सर्व वॉर्डात बर्फ विक्रेते, हॉटेल्स, फ्रुट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, डेअरी, मिठाईची दुकाने, बर्फाचे गोळेवाले, लस्सी-ताक विक्रेते आणि फास्ट फूड सेंटर्स यांची पाहणी करून ९४८ बर्फाचे नमुने जमा केले होते. या पाहणी अहवालात ९२ टक्के बर्फात ई-कोलाय हे विषाणू आढळून आले होते. त्यामुळे आता पाण्याला वास येत असल्यास तत्काळ पालिकेच्या वॉर्ड ऑफिसला कळवा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य खात्याने केले आहे.
No comments:
Post a Comment