मी कोणत्याही चौकशीला तयार - आमदार आशिष शेलार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2016

मी कोणत्याही चौकशीला तयार - आमदार आशिष शेलार

मुंबईदि. 27 जुलै- गेली दीड-दोन वर्षे माझ्या अधिकृत व्यवसायातील माहीती चुकीच्या पध्दतीने सादर करून माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. कधी मेसेज, कधी फोन तर कधी वर्तमान पत्रांना चुकीच्या पद्धतीने माहिती देऊन आणि अॅन्टी करप्शन ब्युरोकडे निनावी तक्रार करून माझ्या भोवती संशयाचे वातावरण तयार केले जात आहे, हे राजकीय षडयंत्र आहे, त्यामुळे आज आप ने केलेल्या आरोपानंतर मीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून खरच एकदा चौकशी करून सत्य जनतेसमोर आणा, अशी मागणी केल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.


आम आदमी पार्टीने आरोप केल्या नंतर तासा भरातच तत्काळ भाजपा प्रदेश कार्यालयात आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू माध्यमांसमोर मांडली व त्यावेळी आप च्या नेत्यांनी केलेले आरोप पुराव्यासह फेटाळून लावले व स्वतःच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केल्याचे पत्र ही माध्यमांना सादर केले. अशा प्रकारे आरोप करून एकदा माझी बाजू मांडण्याची संधी मिळाली असे सांगत त्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे खंडन करत, आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत असेही जाहीर केले.

ज्यांना बँकिंग आणि कंपनी व्यवसाय याबाबत माहिती नाही, अशांनी छगन भुजबळ, मनी लॉन्ड्रीग असे शब्द आणि संदर्भ जोडून याची मोठी बातमी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याची कागदपत्रे नीट पहिली तर त्यांच्या या आरोपात कोणतेही सत्य नसल्याचे समोर येईल, असेही त्यांनी सांगितले. मी कोणताही अनधिकृत व्यवसाय केलेला नाही अथवा कोणतीही माहीती लपवलेली नाही, निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे  जो व्यवसाय करतो त्याचा कर भरलेला आहे, असे स्पष्ट करत त्याबाबतची सर्व कागदपत्रे ही त्यांनी सादर केली.

ज्या कंपन्यांच्या नावाने आरोप झाले त्याची माहिती खालील प्रमाणे.

१. सर्वेश्‍वर लॉजिक सर्विस या कंपनीचा मी २० एप्रिल २०१० ला डायरेक्टर झालो, माझ्या अन्य कामांचा व्याप वाढला व या कंपनीच्या प्रोजेक्टला उशीर झाला. त्यामुळे मी डिसेंबर २०१५ ला या कंपनीचे काम बंद केले व मे २०१६ ला मी या कंपनीतून राजीनामा देऊन बाहेर पडलो. या कंपनीत १ लाख रुपयांचे शेअर असून माझा हिस्सा ३३ टक्के आहे. लॉजिस्टीक चा व्यवसाय सुरु करण्यासाठी ही कंपनी तयार करण्यात आली होती. ज्यावेळी सन २०१० ला मी या कंपनीत सहभागी झालो तेव्हा मी आमदार नव्हतो अथवा माझ्या पक्षाचे सरकार राज्यात अथवा केंद्रात नव्हते, त्यामुळे कुठलीही शासकीय सवलत मी घेतलेली नाही. या कंपनीमध्ये १७ मे २०१० रोजी २० लाख व २६ मे २०१० रोजी ५ लाख असे मिळून २५ लाख रुपयांची गुंतवणूक केली. ती रक्कम माझ्या खाजगी अकाऊंट मधून देण्यात आली आहे. तर  या कंपनीने प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून जनकल्याण बँकेकडून १७ कोटी रुपये कर्ज मागितले. त्यासाठी मी माझी वैयक्तिक मालमत्ता तारण ठेऊन जामीन राहिलो आहे. आज पर्यंत यापैकी टप्प्या-टप्प्याने ६ कोटी रुपये बँकेने अदा केले आहेत. माझा वकिलीचा व सल्लागाराचा व्यवसाय असून त्यातील आलेले पैसे मी या कंपनीत गुंतवले होते. मात्र आता या कंपनीचा प्रोजेक्ट उशीर होत असल्यामुळे मी यातून राजीनामा देऊन बाजूला झालो आहे त्यामध्ये माझी गुंतवणूक असून ती परत कशी करावी याबाबत कंपनी ने निर्णय घेतलेला नाही. या कंपनीचे २०१० पासून २०१५ पर्यंत बॅलेन्स शीट असून त्याचा आयकर भरलेला आहे व हिशेब तपासणीसाने कागदपत्रांची पूर्ण तपासणी केलेली आहे.    

२. रिध्दि डेलमार्क प्रा. ली. ही कंपनी माझ्या नावे होती. या कंपनीच्या नावे कुठलाही व्यवहार झालेला नाही तसेच या कंपनीची कोणतीही स्‍थावर मालमत्‍ताही नाही.  याबाबतचीही माहिती माझ्या निवडणुक प्रतिज्ञापत्रात मी दिलेली आहे. यामध्ये माझी केवळ ५० हजार रुपये गुंतवणूक आहे. या कंपनीला गौतम रिसोर्स यांनी २० लाख रुपयांचे कर्ज दिले त्याचे शेअर  या कंपनीने गौतम रिसोर्स ला दिले आहेत. हे २० लाख रुपये या कंपनीने सर्वेश्‍वर लॉजिक सर्विसला दिले असून त्याची नोंद सर्वेश्‍वर लॉजिक सर्विसच्या बॅलेन्स शीट मध्ये आहे. सर्वेश्‍वर लॉजिक सर्विस ने या २० लाखांचे शेअर्स देण्याबाबतची बोलणी सुरु आहे. ही कंपनी बंद करण्याच्या प्रक्रियेला एप्रिल  2016 ला सुरू झाली आहे.

३. ऑपेरा रिलेटर या ही कंपनीचा मी संचालक होतो. त्‍यामध्‍येही कोणताही व्‍यवहार झालेला नाही. त्‍याचीही कोणतीही स्‍थावर मालमत्‍ता नाही.  आणि याबाबत मी माझ्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती दिली आहे. ही कंपनीही बंद करण्याची प्रक्रिया पुर्ण होत आली आहे. या दोन्ही कंपन्या लॉजिस्टीकसाठी मालमत्ता भाड्याने देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आल्या मात्र त्यात कोणताही व्यवहार करणे मला जमले नाही, त्यामुळे त्या बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली.

४. याशिवाय अल्‍हाद कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही. सुनिल परब आणि प्रकाश पाटील हे माझे पीए नाहीत ते माझे मित्र आहेत. त्या कंपनीशी माझा कोणताही संबंध नाही. त्यांनी केलेल्या व्यवहाराची माहिती ही अधिकृत त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्यांनी व्यवसाय सुरु केल्यामुळे मी त्यांना मदत केली होती.
या तिन्ही कंपन्यांमधील माझी प्रत्यक्ष ३५ लाख व अप्रत्यक्ष असे एकूण गुंतवणूक ४५ लाख या पेक्षा जास्त नाही, त्याबाबत संबंधित यंत्रणांपासून काहीही लपवलेले नाही. या कंपन्यांपैकी २ कंपन्या बंद होत आल्या आहेत तर एका कंपनीचा प्रोजेक्ट अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे त्यात कोणतीही व्यवसायिक आवक जावक झालेली नाही, त्यामुळे कोणाही मोठा व्यवहार झाला नसताना माझ्या भोवती उगाच संशयाचे वातावरण तयार करण्यात येत आहे आणि ते राजकीय हेतूने आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला मुंबई भाजप चे महामंत्री आमदार योगेश सागर, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, श्वेता शालिनी, मुंबई भाजप चे मुख्य प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि संजू वर्मा आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad