एका दिवसात गेस्ट्रोचे 30 रुग्ण
मुंबई / प्रतिनिधी 4 July 2016
मुंबईत मूसळधार पाऊस पडत असतानाच नागरिकांकडून दूषित पाण्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाने ही डोकवर काढले आहे. गेल्या दहा दिवसात गेस्ट्रोचे 479 रुग्ण आढळले आहेत. तर सोमवारी एका दिवसात गेस्ट्रोच्या 30 रुग्णाना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेस्ट्रो सोबत मलेरियाचे 482 रुग्ण, कावीळचे 166 रुग्ण, डेंगूचे 153 रुग्ण आणि कॉलराचा 1 रुग्ण आढळून आला असून या सर्वाना विविध सरकारी, पालिका तसेच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही आकडेवारी गेल्या दहा दिवसांची असून आज सोमवारी मलेरियाचे 9 रुग्ण आणि डेंगूचे 2 रुग्ण आढळून आलेले आहेत.
गेस्ट्रो हा आजार दूषित पाण्यामुळे होतो. गेल्या 15 दिवसात दूषित पाण्याबाबत 40 तक्रारी महापालिकडे आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक 7 तक्रारी अंधेरी येथील के वेस्ट वार्ड मधून तर त्या पाठोपाठ दहिसर येथील आर मध्य वार्ड मधून 5 आणि बोरीवली येथील आर दक्षिण वार्ड मधून 4 तक्रारी आलेल्या आहेत.
दरम्यान, पावसाळ्यात पालिकेद्वारे जो पाणी पुरवठा केला जातो त्यामध्ये दूषित पाणी होण्याचे प्रमाण हे 1 टक्का असते. पण उघड्यावरील पदार्थ खाताना तेथील पाणी हे सर्वाधिक दूषित असल्यानेच साथीचे आजार होत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे उघड्यावरील पदार्थ खाऊ नये तसेच तेथील पाणी पिऊ नये, असे आवाहन पालिकेतर्फे केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment