भ्रष्ट अधिकाऱ्याला पकडून दिल्याने तोडलेल्या घरात राहण्याची वेळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2016

भ्रष्ट अधिकाऱ्याला पकडून दिल्याने तोडलेल्या घरात राहण्याची वेळ

पाल यांना महापालिका आयुक्त न्याय देणार का ? 

मुंबई / अजेयकुमार जाधव  7 July 2016

मुंबई महानगरपालिकेच्या एस विभागातील अधिकारी आणि अधिकार्यांच्या दलालाला पैसे घेताना लाच लुचपत विभागाद्वारे अटक केल्याचा राग म्हणून पालिकेने पाल यांचे घर तोडले. आपले घर बांधून मिळावे, आणि अधिकार्यांच्या दलालाच्या सर्व अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी म्हणून पाल हे गेले वर्ष भर पालिकेच्या फेऱ्या मारत आहेत. आयुक्त अजोय मेहता यांनी याबाबत कारवाईचे आदेशही दिले आहेत. परंतू आयुक्तांच्या आदेशाला स्थानिक अधिकारी भीक घालत नसल्याने पाल यांना मागील पावसाळ्या प्रमाणे हाही पावसाळा आपल्या तुटलेल्या घरामध्ये घालवावा लागत आहे. स्थानिक मुजोर अधिकारी अधिकारी पाल यांना सतावत असल्याने आयुक्त स्वतः पाल यांना न्याय देणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

रामदुलार पाल हे भांडुपच्या तुळशेतपाडा येथे राहतात. ते राहत असलेली जागा १६ सप्टेंबर १९७६ साली महाराष्ट्र शासनाने गलिच्छ वस्ती म्हणून जाहिरी केली आहे. रामदुलार पाल यांच्याकडे ते राहत असलेल्या जागेवरील १९९४ पूर्वीचे पुरावे आहेत. या वस्तीमधील इतर रहिवाश्यांनी येथील स्थानिक गुंड आणि पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून ३० फुटाची घरे बांधली आहेत. पाल यांनीही आपले घर पालिका अधिकारी आणि स्तःनिक गुंडाला भिक न घालता १९ फुटाचे केले. याची तक्रार पालिकेकडून तक्रार आणि पालिकेने पाल यांच्या बांधकामाला तोडण्याची नोटीस रद्द करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. लाच मागणाऱ्या विरोधात लाच लुचपत विभागात तक्रार केल्यावर १० हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना कनिष्ठ अभियंता योगेश पंडित व तक्रारदार दलाल रामसुरत यादव यांना २५ जुलै २०१५ रोजी अटक केली आहे. अभियंत्याला अटक करताच इतर अधिकाऱ्यांनी पाल यांना धडा शिकवण्यासाठी भर पावसाळ्यात नियम धाब्यावर बसवत त्यांचे घर ऑगस्ट २०१५ मध्ये तोडले आहे. 

याबाबत पाल हे गेले एक वर्ष पालिकेचे एस विभाग कार्यालय, उपायुक्त, आणि पालिका आयुक्त यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. पाल यांनी मुंबईच्या आझाद मैदानात याविरोधात उपोषणही केले आहे. मानवी हक्क आयोग आणि लोकशाही दिनी आयुक्तांची भेट घेतल्यावर पाल यांचे घर बांधून देण्याचे तसेच पालिका अधिकाऱ्यांचा दलाल असलेल्या रामसुरत यादव याची सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचा गैरवापर करत एस विभागातील अधिकाऱ्यांनी येतील स्थानिक लोकांना पाल यांनी तुमची घरे तोडण्याची तक्रार केल्याचे सांगून भडकवण्याचाही प्रयत्न केला आहे. स्थानिक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी पाल यांना सातत्याने धमकवत आहेत. यामुळे पाल आणि त्यांचे कुटुंबीय दोन पावसाळे आपल्या तुटलेल्या घरामध्ये राहत आहेत. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणी स्वतः जातीने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी पाल यांनी केली आहे. आयुक्त अजोय मेहता यांनी न्याय न दिल्यास आयुक्तांच्या कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा पाल यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad