मुंबई दिनांक २६ जुलै, २०१६ - बाई यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नारायणदास मोरबाई बुधरानी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ जुलै रोजी साजऱया होणाऱया 'जागतिक मस्तिष्क व घसा कर्करोग दिन' चे औचित्य साधून आज (दिनांक २६ जुलै, २०१६) समारंभ आयोजित करण्यात आला.
या समारंभास प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्करोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख, जगप्रसिद्ध कर्करोतज्ज्ञ डॉ. सुलतान प्रधान, महापालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, प्रिन्स अली खान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी वैद्यकीय संचालक डॉ. संजय ओक यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, कान, नाक, घसा विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. बची हाथिराम व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि प्रिन्स अली खान रुग्णालय यांनी सार्वजनिक – खासगी सहभाग (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर फेब्रुवारी २००८ मध्ये मस्तिष्क व घसा कर्करोग उपचार कार्यक्रम हाती घेतला. यामध्ये प्रिन्स अली खान रुग्णालयातील कर्करोग शस्त्रक्रिया विभागप्रमुख, जगप्रसिद्ध कर्करोतज्ज्ञ डॉ. सुलतान प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली नायर धर्मादाय रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाचे वैद्यकीय अधिकारी,प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांना कर्करोग उपचारांकरीता प्रशिक्षित करण्यात आले. समवेत नायर रुग्णालयातील विद्यमान कान, नाक, घसा उपचार विभाग हे मस्तिष्क व घसा कर्करोग उपचारांकरीता सुसज्ज करण्याचेही उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले.
गतवर्षी बाई यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मादाय रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात मस्तिष्क व घसा कर्करोग उपचारांकरीता अद्ययावत संयंत्रे आणि सर्व सुविधांसह सुसज्ज असा विभाग नारायणदास मोरबाई बुधरानी ट्रस्ट यांनी दान केला. त्याकरीता संपूर्ण आर्थिक व अनुषांगिक सहाय्य त्यांनी पुरविले. यामुळे कान, नाक, घसा उपचार विभागाला संलग्न असा मस्तिष्क व घसा कर्करोग उपचार विभाग उभारणे शक्य झाले असून याठिकाणी निदान ते सर्वंकष उपचाराच्या सुविधा उपलब्ध आहेत. या मस्तिष्क व घसा कर्करोग उपचार विभागाचा आजवर सुमारे १५०० रुग्णांना लाभ झाला आहे. कान, नाक, घसा विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. बची हाथिराम आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. विकी खट्टर यांच्या मार्गदर्शनाने हा विभाग कार्यान्वित झाला आहे.
नायर रुग्णालयात रेडिएशन, मेडिकल ओंकोलॉजी या सुविधांसह फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, रिहॅबिलीटेशन या सर्व सुविधा देखील उपलब्ध आहेत. यामुळे मस्तिष्क व घसा कर्करोग रुग्णांना आता नायर रुग्णालयात सर्वंकष उपचार, ते ही विनामूल्य उपलब्ध होत आहेत.
No comments:
Post a Comment