पेंग्विन असणारे भारतातील पहिलेच प्राणिसंग्रहालय
मुंबई २६ जुलै २०१६ - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा स्थित वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आठ हम्बोल्ट पेंग्विन दाखल झाले असून यामध्ये एकूण ३ नर व ५ मादी यांचा समावेश आहे. जगातील १०० पेक्षा अधिक प्राणिसंग्रहालयांमध्ये हम्बोल्ट पेंग्विन आहेत.
हम्बोल्ट पेंग्विन हे पक्षी पेरु आणि चिली यांच्या समुद्रधुनीमध्ये आढळतात. या समुद्रधुनीतून हम्बोल्ट हा शीतप्रवाह वाहत असल्याने या पेंग्विनना'हम्बोल्ट पेंग्विन' असे संबोधले जाते. सदर हम्बोल्ट पेंग्विन पक्षी ४ ते २५ डिग्री अंश सेल्सिअस एवढ्या तपमानात राहू शकतात.
एक ते तीन वर्षे वयाचे हे हम्बोल्ट पेंग्विन असून त्यांचे सध्याचे वजन सुमारे एक ते अडीच किलो एवढे आहे. सद्यस्थितीत १२ ते १५ सेंटीमीटर उंची असलेल्या या पक्ष्यांची पूर्णतः वाढ झाल्यानंतर त्यांची उंची सुमारे ६५ ते ७० सेंटीमीटर इतकी होईल. त्यावेळी त्यांचे वजन ४ ते ६ किलो इतके असू शकेल. २० ते २५ वर्षे आयुर्मान असणारे हम्बोल्ट पेंग्विन प्रारंभीच्या तीन महिन्याकरीता पूर्णतः देखरेखीखाली आणि खास तयार केलेल्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहेत.
दक्षिण कोरिया येथील सेऊल महानगरातील कोएक्स मत्स्यालयातून हे हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले असून मुंबईतील वातावरणाशी त्यांना जुळवून घेण्याकरीता साधारणतः २ ते ३ महिने कालावधी अपेक्षित आहे. यानंतर हम्बोल्ट पेंग्विन प्रदर्शन कक्षात त्यांना स्थलांतरित करण्यात येईल. त्यानंतर मुंबईकरांना हे हम्बोल्ट पेंग्विन पाहता येतील. याकरीता प्राणिसंग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये तळ मजल्यावर सुमारे १७०० चौरस फूट क्षेत्रफळाचे संपूर्णपणे वातानुकूलित पेंग्विन प्रदर्शन कक्ष तयार करण्यात आले असून त्याचे तपमान १६ ते १८ डिग्री अंश सेल्सिअस इतके नियंत्रित करण्यात आले आहे. हम्बोल्ट पेंग्विनच्या जीवशास्त्रीय गरजा आणि वर्तवणूकीय बाबी लक्षात घेऊन हे पक्षीगृह बनविण्यात येत आहे.
बांगडा आणि मोरशी प्रजातीचे मासे हा या हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांचा आहार असून दररोज त्यांना अर्धा ते एक किलो मासे खाद्य म्हणून पुरविण्यात येतील. सदर पक्ष्यांना सध्याच्या कक्षात ठेवण्यासाठी सुमारे ६ ते ८ हजार लीटर पाणी लागणार असून मुख्य कक्षात स्थानांतरित केल्यानंतर तेथे वार्षिक साधारणतः ६० ते ८० हजार लीटर्स पाणी पुरवावे लागणार आहे.
No comments:
Post a Comment