मुंबई, दि. 28 : यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेतील चार अल्पवयीन मुलींवर शिक्षकांनी अत्याचार केल्याची घटना अत्यंत गंभीर असून शाळेचे मुख्याध्यापक व सचिव यांना नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे यादृष्टीने हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य संदीप बाजोरिया यांनी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारातील आरोपींवर कारवाई करण्याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना केसरकर बोलत होते. राज्यामधील शाळेतील मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये यासाठी सर्व शाळांना परिपत्रक काढण्याची सूचना शिक्षण खात्याशी चर्चा करुन लवकरात लवकर काढण्यात येईल. त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी स्वयंसेवी संस्था आणि शिक्षण खाते यांच्यासोबत बैठक घेऊन करण्यात येणाऱ्या सूचनांच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या जातील, असेही केसरकर यांनी यावेळी सांगितले. सदस्य विद्या चव्हाण यांनी चर्चेत सहभाग घेतला होता.
No comments:
Post a Comment