लद्दाख मधील डॉ आंबेडकर मेमोरियल सेंटरला महाराष्ट्र सरकार मदत करणार : मुख्यमंत्री
लेह/लद्दाख : २४ जुलै २०१६
देशाला नव्या उंचीवर नेणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिमालयीन पर्वत रांगांमध्ये असलेल्या लेहमधील (लडाख) पुतळ्याचे अनावरण ही या महामानवाला दिलेली एक अनोखी मानवंदना आहे, असे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
जम्मू-काश्मिरमधील लडाख भागातील लेहजवळ महाबोधी इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरतर्फे उभारण्यात आलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण रविवारी (दि.24) फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, थायलंडचे भारतातील राजदूत चलित मनित्याकूल, भंते संघसेना महाथेरा, जैन धर्मगुरु लोकेश मुनी यांची प्रमुख उपस्थिती होती. या पर्वतीय भागात उभारण्यात आलेला बाबासाहेबांचा हा पहिलाच पुतळा असून त्याच्या अनावरणासोबतच येथे स्थापण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल पार्कचा शिलान्यासही फडणवीस यांच्या हस्ते झाला.
देशाला महासत्ता करण्याचा मार्ग संविधानाने दाखविला असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, जपानमधील कोयासन विद्यापीठात उभारण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण गेल्या वर्षी करण्यात आले. तसेच लंडन येथे त्यांचे वास्तव्य असलेले घरही आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून खुले करण्यात आले आहे. शासनाच्या प्रयत्नातून नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या विकासाचे कामही सुरु झाले आहे. मुंबईतील इंदू मिलच्या जागेवरील बाबासाहेबांच्या भव्य स्मारकाच्या उभारणीची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. त्यानंतर हिमालयीन पर्वतरांगातील शिखरांमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे हा एक गौरवपूर्ण क्षण आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वावर उभा असलेला बौद्ध धर्म ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक श्रेष्ठ देणगी आहे, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यांनी काढले. बाबासाहेबांचे जीवन कार्य आणि विचारांचे प्रतिक असणाऱ्या प्रस्तावित डॉ.आंबेडकर मेमोरियल पार्कला महाराष्ट्र सरकारकडून योग्य ती मदत केली जाईल. तसेच याबाबत महाराष्ट्र सरकार जम्मू आणि काश्मिर सरकारशी चर्चा करून या केंद्रास सहकार्य करण्याची विनंती करेन, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे आणि त्यांच्या परिवाराने हा पुतळा दिलेला आहे.
No comments:
Post a Comment