· डीएनएचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य
· न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या डॉक्टरांचे विशेष पथक
· 27 विशेष न्यायालये तर 22 जलदगती न्यायालये स्थापन
· महिलांच्या सुरक्षेसाठी ‘प्रतिसाद’ हे मोबाईल ॲप
मुंबई, दि. 20 : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून त्याची सुनावणी नियमित घ्यावी, तिला स्थगिती देऊ नये. अशी विनंती उच्च न्यायालयास करण्यात येईल. त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्यात येईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. कोपर्डी, जिल्हा अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी विधानपरिषदेत नियम 97 अन्वये चर्चा करण्यात आली. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
या घटनेच्या तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले असून न्यायवैद्यक पुरावे गोळा करुन आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्याची कारवाई लवकरच करण्यात येईल. राज्य शासनाने हे प्रकरण गांभीर्याने हाताळले असून यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, या घटनेचे गांभीर्य मोठे आहे. राज्यात अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने ठोस पावले उचलली आहेत. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून ज्या चौथ्या संशयिताचा उल्लेख केला जात आहे त्याचा या घटनेशी संबंध आहे किंवा कसे याची खातरजमा केली जात आहे. या घटनेमध्ये त्याचा सहभाग आढळून आल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल. या चौथ्या संशयितावर एका खूनाच्या प्रकरणात हात असल्याचा आरोप आहे. या आरोपाची शहानिशा करण्यासाठी या खून प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) चौकशी करण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.
या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्यासाठी ते जलदगती न्यायालयाकडे सोपविण्यात आले असून त्याची सुनावणी नियमित घ्यावी. तिला स्थगिती देऊ नये, अशी विनंती उच्च न्यायालयाच्या माध्यमातून या जलदगती न्यायालयाला करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले असून डीएनए अहवालासह न्यायवैद्यक पुरावे लवकरात लवकर जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याआधारे संयशितांवर आरोपपत्र दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
ही घटना घडल्यानंतर या क्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी लगेचच घटनास्थळास भेट दिली होती. त्याचबरोबर पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्र्यांनीही घटनास्थळी भेट दिली होती. मी देखील या प्रकरणाच्या तपासाची वेळोवेळी माहिती घेत होतो, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
महिला अत्याचार प्रकरणी राज्य शासन संवेदनशील असून राज्यात महिला अत्याचार, बलात्कार, अपहरणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यपातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यात 27 विशेष न्यायालये तर 22 जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली आहे. सिंधूदुर्गच्या एका प्रकरणात जलदगती न्यायालयात दीड महिन्यात निकाल लागलेला आहे. बलात्कार व ॲसिड हल्ला पिडित महिलांसाठी मनोधैर्य योजना सुरु असून सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी भा.द.वि. 379अ आणि ब या कलमांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी ‘प्रतिसाद’ हे मोबाईल ॲप तयार करण्यात असून 103 व 1091 हा टोल फ्री मोबाईल क्रमांक सुरु करण्यात आला आहे. महाराष्ट्रने ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेंतर्गत उत्कृष्ट काम केले असून हरविलेल्या मुला-मुलींना घरापर्यंत पोहचविण्याचे काम या मोहिमेंतर्गत करण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एका अधिकाऱ्याला बालकल्याण अधिकारी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. राज्यातील बलात्काराच्या गुन्ह्यातील अपराध सिध्दीकरणाचे प्रमाण हे आठ टक्क्यांवरुन 21 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. बलात्कार कायद्याच्या सुधारणेनंतर तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बदल्यांबाबत घडलेल्या घटनेबाबत बदल्यांचा जो प्रस्ताव होता तो नियमानुसार होता किंवा कसे याबाबतची चौकशी मुख्य सचिवांमार्फत करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,सदस्य नारायण राणे, भाई जगताप, प्रविण दरेकर, नीलम गोऱ्हे, प्रा. जोगेंद्र कवाडे, हेमंत टकले, हुस्नबानो खलिफे, जयंत पाटील, भाई गिरकर, विद्या चव्हाण, कपिल पाटील, विनायक मेटे आदी सदस्यांनी भाग घेतला.
No comments:
Post a Comment