मुंबई, दि. 28 : मुंबई महानगरपालिकेमार्फत रस्ते विकास व सुधार कामात अनियमितता आढळून आल्याने चौकशीत दोषी असलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात आली असून मागील कालावधीतील 5 कोटींवरील रक्कमेच्या 200 रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्यात येत आहे. या चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर त्यानुसार तातडीने कडक कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.
मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या रस्ते कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्याने संबंधित कंत्राटदार आणि पालिकेतील अधिकारी यांच्यावर करावयाच्या कारवाई संदर्भात सदस्य नारायण राणे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यास उत्तर देताना पाटील बोलत होते.
सध्याच्या प्रचलित पध्दतीने टेंडर प्रक्रिया झालेली असून भ्रष्टाचारात समावेश असलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांची चौकशी करुन पोलिस तपास केला जात आहे. यामध्ये रेलकॉन इन्फाप्रोजेक्टस लि. संचालकास, पालिकेच्या दोन मुख्य अभियंते व एक कार्यकारी अभियंता यास पालिकेमार्फत निलंबित करुन अटक तर निलंबित दोन कार्यकारी अभियंता आणि चार दुय्यम अभियंता यांच्या विरुध्द विभागीय चौकशी सुरु आहे, असे पाटील यांनी सांगितले.
रस्ते घोटाळ्यासंदर्भात झालेल्या आतापर्यंतच्या चौकशीत 14 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले असून राहिलेल्या कामांच्या चौकशीतून आणखी किती रुपयांचा गैरव्यवहार झाला हे समोर येईल, असे पाटील यांनी सदस्य संजय दत्त यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
यावेळी सदस्य प्रविण दरेकर, संजय नार्वेकर, जयंत पाटील,शरद रणपिसे, निरंजन डावखरे व इतर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.
No comments:
Post a Comment