मुंबई,दि.20 : पुणे-बंगलोर महामार्गावरील भुईंज येथील भुयारी मार्गाचा स्लॅब कॉन्क्रीटींकरण करताना कोसळल्यानंतर संबंधित दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा येथील अधिक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील उड्डाण पुलाचा स्लॅब कोसळल्याबाबतचा प्रश्न विधानसभा सदस्य शशिकांत शिंदे,पृथ्वीराज चव्हाण, प्रशांत बंब, अजित पवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. पाटील या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा अत्यंत महत्वाचा महामार्ग असल्याने या महामार्गाचे काम सन 2017 पर्यंत पूर्ण होणे आवश्यक आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 6 ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असलेल्या पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण प्रकल्पामधील भुईंज येथील भुयारी मार्गाचा स्लॅब 27 एप्रिल 2016 रोजी कॉन्क्रीटीकरण करताना कोसळला होता. या घटनेनंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार सातारा जिल्हाधिकारी यांनी संबंधित घटनेची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली असून याबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांना कळविले आहे. या चौकशी समिती या प्रकरणाबाबतचा अहवाल या महिन्याच्या अंती देणार असून या अहवालानंतरच दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी पुढे सांगितले.
No comments:
Post a Comment