इमारती तोडण्याची वाचवण्याची कामे गायकवाड सारख्या लोकांनाच करू द्या
मुंबई / प्रतिनिधी 11 july 2016 :
केंद्रीय मंत्रिमंडळ छोटे असेल असा दावा करणाऱ्या मोदी सरकारने सामाजिक न्याय विभागासाठी आधीच दोन राज्यमंत्री असताना आणखी एक तिसरे राज्यमंत्री पद निर्माण करून रामदास आठवले यांना राज्यमंत्री बनवले आहे. सरकारला मंत्री बनवून लाल दिवेच वाटायचे असल्यास आणि रामदास आठवले सारख्या मंत्र्यांची लाल दिव्याची हौस पूर्ण करावयाची असल्यास अश्या सर्वाना रुग्णवाहिका वाटाव्यात अशी टीका बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष अँड. सुरेश माने यांनी केली आहे. २७ जुलै रोजी आयोजित केलेल्या मोर्चा संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माने बोलत होते.
आंबेडकर भवन बाबत सर्व संघटना आणि आंबेडकरी जनता ट्रस्टींच्या विरोधात उभी राहीली असल्यानं बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची याबाबत भूमिका काय असे विचारले असता, आम्हाला आंबेडकरी चळवळ चालवायची आणि वाढवायची आहे. इमारती बांधून चळवळ वाढत नाही. इमारती तोडण्याची आणि त्या सांभाळण्याचे कामे गायकवाड सारख्या लोकांनाच करू द्या अशी टिकाही माने यांनी केली. गायकवाड आणि ट्रस्टींनी जे प्रकार केले आणि जी भाषा वापरली त्याच्यामुळे समाजात आक्रोश असून हा आक्रोश सध्या मोर्चा आणि निदर्शनामधून दिसत असल्याचे माने यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वाना सोबत घ्यायला हवे असा सल्ला देताना आम्हाला अजून मोर्चाचे निमंत्रण आलेले नाही. परंतू त्यांनी निमंत्रण दिल्यास १९ जुलैच्या मोर्चात आम्हीही मोठ्या संख्येने सहभागी होऊ असे माने यांनी सांगितले.
स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन देत भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेवर आली. मात्र ते आश्वासन पूर्ण करण्याऐवजी सरकार कारणे देत आहे. छोट्या राज्याच्या रूपात विदर्भाचा विकास व्हावा, म्हणून मुंबईतील भायखळा येथील राणीबागेहून २७ जुलैला सकाळी ११ वाजता आझाद मैदानापर्यंत धडक मोर्चा काढणार असल्याचे माने यांनी सांगितले. विदर्भ मागासलेला आहे म्हणून विकासाचा अनेक क्षेत्रांत अनुशेष बाकी आहे. मात्र मराठवाडा तर अतिमागासला असून रोजगार नियोजन, जलव्यवस्थापन, उद्योग व वीज, रस्ते, शेतीपंप अशा विविध सुविधांपासून मराठवाड्यातील लोक वंचित आहेत. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाप्रमाणे लवकरच स्वतंत्र मराठवाड्याची मागणी होण्यासाठी मराठवाडा आर्थिक विकास कार्यक्रम राबवण्याची मागणी त्यांनी केली.
|
प्रत्येक शेतकऱ्यास आणि शेतमजुराला ५ हजार रुपये पेन्शन, ६५ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा म्हणून ३ हजर रुपये पेंशन, ओबीसी जणगणना, मुस्लिमांना ड्रमच्या आधारावर नव्हे तर सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षण, भटके विमुक्तांना संवैधानिक आरक्षण व स्वतंत्र बजेट, पेसा कायद्याची अंमलबजावणी, वनवासी शब्दावर कायद्याने बंदी, भाजपने १५ लाख रुपये प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा करू असे आश्वासन दिले होते हे आश्वासन पूर्ण करू न शकल्याने ज्यांनी कोणी १५ लाखा पर्यंत कर्ज घेतले आहे ते कर्ज माफ करावे, राज्यात १०० टक्के दारूबंदी, शिक्षण संस्थांचे भगवेकरण बंद करावे, कंत्राटी पद्धत बंद करावी इत्यादी मागण्यांसाठी २७ जुलैला मोर्चाचे आयोजन केल्याचे माने यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भासाठी मुंबईमध्ये निघणारा हा पहिलाच मोर्चा असल्याचा दावा माने यांनी यावेळी केला.
No comments:
Post a Comment