मुंबई, दि. 11 : मंत्रीपदाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाबरोबरच देशातील मागास समाजाला आर्थिक न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच मागासवर्गीय व ओबीसी विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्न करू,अशी माहिती नवनिर्वाचित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज येथे दिली. मंत्रालयात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात आठवले बोलत होते. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर आदी उपस्थित होते.
आठवले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर 70 वर्षांनी रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. त्यामुळे दलित जनतेला आनंद झाला असून मला भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून दलित समाजाला स्वतःच्या पायावर उभे करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे.
मागास समाजातील अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळत नसल्याची तक्रार आहे. तसेच इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. यासंबंधी माहिती घेतली असता, राज्याकडून प्रस्ताव वेळेवर येत नसल्याचे कळाले आहे. त्यामुळे हे प्रस्ताव वेळेत यावेत व शिष्यवृत्तीची रक्कम वेळेत मिळावी, यासाठी आपण स्वतः बैठक घेऊन लक्ष घालणार आहोत. राज्यातील सामाजिक न्याय विभागाचे केंद्राकडे असलेले प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. तसेच देशातील सर्व राज्यातील समाज कल्याण मंत्र्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्या समस्यांवर चर्चा करुन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले.
आठवले म्हणाले की, केंद्रीय सामाजिक न्याय विभागामार्फत नव्या योजना राबविण्याचा विचार आहे. तसेच केंद्राच्या योजना गावपातळीपर्यंत पोचविण्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच कार्यकर्त्यांची मदत घेण्याचाही विचार सुरू आहे. भटक्या विमुक्त जमात ही आजही मागास आहे. या समाजाला नोकरी, शिक्षण व राजकारणामध्ये वेगळे आरक्षण मिळावे,असे माझे मत आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच अनुसुचित जाती जमातीच्या आरक्षणाला धक्का न देता मंडल आयोगाच्या धर्तीवर देशातील इतर समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यास हरकत नाही. दलितांवर अत्याचार करणाऱ्यांवर अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी) नुसार कारवाई व्हावी तसेच या कायद्याचा गैरवापर टाळावा, यासाठी आपला प्रयत्न राहील,असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment