मुंबई, दि. 21 : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई प्रवेशद्वारावरील टोलनाके बंद करण्याबाबत शासन गांभीर्याने विचार करत असून त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबईच्या पाच प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर टोलमाफी तातडीने कार्यवाही करण्याबाबत सदस्य संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. तसेच सदस्य भाई जगताप आणि इतर सदस्यांनी उपप्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर देताना श्री. शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले की, शासनाने राज्यातील 12 टोलनाके पूर्णत: बंद करुन 53 टोलनाक्यांवर हलकी वाहने, एस टी बसेस तसेच शाळेच्या बसेसना टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच टप्प्या-टप्प्याने टोलमुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई प्रवेशद्वार टोल मुक्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती यापूर्वी गठित करण्यात आली होती. तसेच या समितीला दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त होताच याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. तसेच मुंबई प्रवेशद्वारावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ई-टोल लेन निर्माण करणे, टोल लेन वाढविणे व इतर उपाययोजना राबविण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment