मुंबई, दि. 7 : शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.‘झी 24तास’ या वृत्तवाहिनीच्या वतीने मुंबई विद्यापीठात आयोजित ‘संघर्षाला हवी साथ’ या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, झी 24तासचे संपादक डॉ. उदय निरगुडकर उपस्थित होते.
राज्यपाल चे विद्यासागर राव म्हणाले, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थी केवळ दारिद्र्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करु शकत नाही. देशातील सर्वाधिक श्रीमंत राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. राज्यात तसेच मुंबईमध्ये मोठे उद्योग, उद्योजक, वित्तीय, सामाजिक संस्था, समाजसेवक आहेत. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून अशा विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सध्याची शिक्षण पध्दती ही परीक्षानुरुप आहे. ही शिक्षण पध्दती विद्यार्थ्यांना आनंददायी वाटेल तसेच त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी पुरेसा वाव मिळेल असा बदल यामध्ये होणे अपेक्षित आहे, असे म्हणून ‘झी 24तास’च्या ‘संघर्षाला हवी साथ’ या उपक्रमाचे राज्यपालांची कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
केवळ नकारात्मक बातम्या समाजापुढे येतात परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून सकारात्मकता समाजापुढे आल्यास यातून प्रेरणा मिळते. माध्यमांची भूमिका ही या पध्दतीची असू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘संघर्षाला हवी साथ’ हा कार्यक्रम होय. अशा शब्दांत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘झी 24तास’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यातील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment