भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा होईपर्यंत विधान परिषदेचे कामकाज होऊ देणार नाही - धनंजय मुंडे मुंबई, दि. २५ :- राज्यातील डझनाहून अधिक मंत्र्यांचा भ्रष्टाचार आम्ही पुराव्यांसह सभागृहात सादर केला, परंतु सरकारनं पुरावे विचारात न घेता, चौकशी न करता प्रत्येक मंत्र्याला 'क्लिनचीट' दिली. चौकशीशिवाय मंत्र्यांना क्लीनचीट देण्याची पद्धत आम्ही यापुढे चालू देणार नाही, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा करावीच लागेल, तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात घेतली, व मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची न्यायमूर्तींबाबत चौकशी करण्याची मागणी लावून धरली. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभापतींना सभागृहाचे कामकाज अखेर स्थगित करावे लागले.
विधान परिषदेत मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या चर्चेला शासनाकडून मिळालेल्या उत्तरानं असमाधान झाल्यानं मुंडे यांनी भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षण देण्याच्या सरकारच्या भूमिकेवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री शहानिशा न करताना सर्वच मंत्र्यांना क्लीच चीट देतात. परंतु डाळ घोटाळ्याचे आरोप असलेले मंत्री बाजारात ९० रुपयांना मिळणारी डाळ १२० रुपयांना का विकतात, याचं उत्तर सरकार देत नाहीत. महिला व बालविकास खात्याच्या चिक्की व बिस्कीट खरेदी घोटाळ्यात आम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर सरकारनं दिलं नाही. आमचे आरोप कितीही गंभीर असले तरी शासनांचं, उत्तर आधी ठरल्याप्रमाणं एकाच छापाचं असतं, असं मुंडे म्हणाले.
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना ज्या आरोपांवरुन मंत्रिपद सोडावं लागलं, त्याहून कितीतरी गंभीर आरोप विद्यमान मंत्र्यांवर आहेत, परंतु त्यांची चौकशी जाहीर करण्यास सरकार घाबरत आहे, परंतु ही चौकशी जाहिर होईपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू न देण्याचा आमचा निर्धार ठाम आहे, असेही मुंडे यांनी सभागृहात स्पष्ट केले. भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी विरोधी पक्षांची आग्रही आणि आक्रमक भूमिकेनंतर सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.
No comments:
Post a Comment