मुकेश श्रीकृष्ण धावडे, ता. 30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घरघर शौचालय हि योजना सर्वत्र प्रसिद्ध झाली असली तरी वडाळा पश्चिम आर.ए.किडवाई मार्ग येथील प्रबुद्ध नगर येथे असलेल्या नॅशनल मार्केटमधील शौचालयाची देखरेख करण्यासाठी देण्यात आलेल्या जागेत चक्क होलसेल कपड्यांचे दुकान उभारण्यात आले आहे.
पालिकेच्या नियमानुसार शौचालयाच्या (केअरटेकर) देखरेखीसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेत कोणतेही दुकान असू नये मात्र असे असतानाही पालिका व लोकप्रतिनिधीच्या संगनमताने येथे गेल्या तीन वर्षांपसून कपड्यांचे दुकान चालवण्यात येत असल्याचा गैरप्रकार निदर्शनास आला आहे. याघटनेबाबत वारंवार तक्रारी करूनही येथील लोकप्रतिनिधी तसेच पालिका एफ दक्षिण विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप समाजसेवक सिद्धीकी शेख यांनी केला आहे. तर गेल्या काही दिवसापूर्वी या सुलभ शौचालयाचा मुद्दा प्रभाग समितीत गाजल्याने आज महापालिका एफ दक्षिण, एफ उत्तर विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा नगरसेविका हेमांगी चेंबूरकर यांनी पालिका सहायक अभियंता परशुराम कुर्हाडे आणि काही आधीकार्यासह शौचालयाची पाहणी केली. असता शौचालयाच्या केअरटेकर खोलीत चक्क कपड्याचे दुकान थाटल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे चेंबूरकर यांनी संताप व्यक्त करीत याबाबत तात्काळ दखल घेऊन पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे या घटनेची माहिती मांडण्यात येईल असे सांगितले.
पंचरत्न सुलभ शौचालय या संस्थेस ''पैसे द्या व वापरा'' या तत्वावर वडाळ्यातील प्रबुद्ध नगर येथे असलेल्या नॅशनल मार्केटमध्ये शौचालय बांधण्यास प्रमुख अभियंता (एम.एस.डी.पी.) यांनी क्र. ChE/3375/MSDP (ता. 5) ऑक्टोंबर 2006 अन्वये मंजुरी देण्यात आली होती. मात्र पंचरत्न सुलभ शौचालयाच्या केअरटेकर रूममध्ये बेकायदेशीर रित्या कपडे विक्रीचे दुकान चालवण्यात येत होते. पालिकेच्या नियमात नसतानाही केअरटेकर रुमच्या जागेवर बेकायदेशीर रित्या कपड्याचे दुकान चालवत असल्याचे समाजसेवक सिद्धिक शेख यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या संस्थेस काळ्या यादीत टाकण्यात आले असून शौचालय चालवण्याचे काम हि 2014 मध्ये काढून घेण्यात आले आणि ते काम प्रतिक सामाजिक प्रतिष्ठान व श्रमिक सुशिक्षित बेरोजगार सेवा संघ या दोन संस्थेना 'पैसे द्या व वापरा'' या तत्वांवर चालवण्यास देण्यात आले मात्र याही संस्थांनी येथे बेकायदेशीर रित्या कपड्यांचे गारमेंट सुरु केले होते याची माहिती मिळताच पालिका एफ दक्षिण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती मात्र पालिकेचा अंकुश नसल्याने; तसेच लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद असल्याने येथे पुन्हा शौचालयाच्या जागी नॅशनल मार्केट परिसरात राहणाऱ्या अब्बास कालवे नावाच्या इसमाने शौच्यालयाच्या देखरेखीसाठी असलेल्या केअरटेकर जागेत कब्जा करून महिना 20 हजार रुपये भाड्याने एका कपडे व्यापाऱ्याला दिली आहे. यामुळे शौचालया अभावी येथील दुकानदार व खरेदीदार ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या मार्केटमध्ये 450 दुकाने असून पंधरा हजार लोकांचे प्रती दिवस येणे - जाणे आहे. शौचालयाच्या राखीव जागेत 6 शौचालय आणि 3 मुतारी आहेत मात्र येथे येणाऱ्या नागरिकांच्या तुलनेत ते हि कमी पडत आहेत. तसेच येथे येणाऱ्या महिलांची ही संख्या अधिक आहे मात्र त्याच्या सोयीसाठी 'राईट टू पी' चा कायदा अमलात असतानाही महिलांसाठी एक ही शौचालय येथे नाही.या शौचालयाच्या गंभीर समस्या असतानाही शौचालयाच्या केअरटेकर रूमवर शौचालय उभारण्या ऎवजी बेकायदेशीरपने कपड्यांचे दुकान उभारण्यात आले आहे.
याबाबत एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक अभियंता (घन कचरा व्यवस्थापण) परशुराम कुर्हाडे यांच्याशी चर्चा केली असता या बेकायदेशीर कामावर 2015 मध्ये हातोडा मारण्यात आला होता. परंतु या अनधिकृत बांधकामावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे पालिकेने केलेल्या कारवाईचा कोणताही परिणाम या केअर टेकरवर होत नाही. त्याचबरोबर कारवाई दरम्यान पोलिसांचे संवरक्षण मिळत नसल्याने येथे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती कुर्हाडे यांनी दिली.
या अनधिकृतपणे चालविण्यात येणाऱ्या कपड्यांच्या दुकानावर अनेकदा पालिकेच्या सहकाऱ्याने कारवाई करण्यात आली आहे. मात्र कारवाई केल्यानंतरही पुन्हा या जागी कपड्यांचे दुकान उभारण्यात येते. त्यामुळे पालिकेने या दुकानावर सक्तीची कारवाई करणे गरजेचे असल्याचे नगरसेविका पल्लवी मुणगेकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment