मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोलमुक्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस करणार रास्ता रोको
मुंबई : १२ जुलै - "टोलमुक्त महाराष्ट्रा'चे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या राज्य सरकारने कोल्हापूरच्या धर्तीवर मुंबईच्या प्रवेशद्वारांवरचे टोल नाकेही बंद करून मुंबईकरांनाही दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी अहिर यांच्या नेतृत्वाखाली आगामी आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईच्या सर्व प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यांसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबईतील पाचही प्रवेशद्वारांवर असलेल्या एमईपीच्या (मुंबई एन्ट्री पॉईंट)टोलनाक्यांवर छोटया वाहनांना टोलमधून सवलत देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याची घोषणा नुकतीच सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केली आहे. मात्र आगामी महापालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने मुंबईतील मतदारांना दाखवलेले हे गाजर असल्याची टीका मा. अहिर यांनी यावेळी केली. विधानसभा निवडणुकीपुर्वीही याच सत्ताधाऱ्यांनी "सत्तेवर आल्यानंतर संपुर्ण राज्यातच टोल माफी केली जाईल',अशी घोषणा केल्याची आठवण करून देत मा. अहिर म्हणाले की, फक्त छोटी वाहनेच नाही, तर सर्वच वाहनांना टोलमाफी देऊन मुंबईच्या प्रवेशद्वारांवर असलेले हे टोल नाके बंद करावेत. येत्या आठवड्यात या मागणीसाठी मुंबईच्या पाचही टोल नाक्यांवर रास्ता रोको आंदोलन छेडण्याची घोषणाही मा.अहिर यांनी केली. येत्या गुरूवारी दिनांक १४ जुलै रोजी या आंदोलनाला सुरूवात होणार असून मा. सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड चेकनाक्यासमोर रास्ता रोको केला जाणार आहे. या आंदोलनात माजी खासदार संजय दिना पाटील हे देखील सहभागी होणार असून मुंबईभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्तेही सामिल होणार असल्याची माहिती मा. अहिर यांनी दिली.
मुंबईही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईतून केंद्राला मोठा महसुल मिळतो.मात्र त्या बदल्यात मुंबईकरांना योग्य त्या सुविधा तर मिळतच नाहीत, शिवाय आपली बिघडलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी सध्या केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईकरांवर भरमसाट असे अतिरिक्त छुपे कर लावले आहेत. या छुप्या करांच्या ओझ्याखाली दबलेल्या मुंबईकरांना किमान दिलासा देण्याची ही चांगली संधी मुख्यमंत्र्यांसमोर चालून आली असल्याचेही ते म्हणाले. या शिवाय भाजपाच्या एका केंद्रीय मंत्र्याने टोल संदर्भात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात,"जो खेल मैने शुरू किया है, उसे खत्म करना भी मै जानता हँू', असे विधान केल्याची अाठवणही मा. अहिर यांनी यावेळी करून दिली.
No comments:
Post a Comment