मुंबई, दि. 21 : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघाताचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दरडी कोसळू नये म्हणून हायटेन्साईल वायर, ब्रायफेन वायर वापरुन दुभाजक ओलांडून होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध करण्यात येत आहे. येत्या सहा महिन्यात या द्रुतगती मार्गावर ई-टोल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसमवेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य सुभाष पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातानंतर मी वेळोवेळी घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्य आणि जखमींवर उपचार यासाठी प्रयत्न केले आहेत. या द्रुतगती महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहे. ‘सेव्ह लाईफ फांऊडेशन’ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्यामध्ये हा द्रुतगती मार्ग ‘झिरो फॅटिलिटी’ कॉरिडॉर करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानुसार सेव्ह लाईफ फांऊडेशन मार्फत द्रुतगती मार्गाची पाहणी करण्यात आली असून त्यांनी सुचविल्यानुसार एकूण 15 उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात आली आहे.
या द्रुतगती मार्गावर दरड कोसळून अपघात होऊ नये म्हणून हायटेन्साईल सेफ्टी वायर बसविण्याचे काम चार ठिकाणी पूर्ण झाले आहेत. हे काम अत्याधुनिक पध्दतीने करण्यात येत असून उर्वरित ठिकाणचे कामदेखील वेळेत पूर्ण करण्यात येणार आहे. रस्ता दुभाजक ओलांडून आलेल्या वाहनांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून असे अपघात टाळण्यासाठी दुभाजकांवर ब्रायफेन वायर बसविण्यात आली आहे. सध्या 14 किमी लांबीच्या रस्त्यावर ही वायर बसविण्यात आली असून 25 किमी लांबीच्या रस्त्यावर वायर बसविण्याचे काम सुरु आहे. हा द्रुतगती मार्ग 100 टक्के सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून खालापूर ते सिंहगड इन्स्टिट्यूट असे 20 किमी लांबीचा बोगदा करण्यात येणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यात मदतच होणार आहे.
वाहनांची वेगमर्यादा, लेन कटिंग टाळण्यासाठी व यासंदर्भात दंडनीय कार्यवाही करण्यासाठी ‘इंटलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. तळेगाव येथील ट्रॉमा केअर सेंटर लवकरच सुरु करण्यात येणार असून त्याठिकाणी सिध्दीविनायक ट्रस्टच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसविण्यात येणार आहे. सध्या या द्रुतगती मार्गावर चार रुग्णवाहिका आणि चार शिघ्र प्रतिसाद वाहन तैनात करण्यात आले आहेत. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, शशिकांत शिंदे, प्रणिती शिंदे,मेधा कुलकर्णी आदींनी भाग घेतला.
No comments:
Post a Comment