मुंबई, दि. 29 : देशातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी माहिती तंत्रज्ञानासोबतच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आज येथे केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मंत्रालयात आंतरवासिता प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांसाठी ‘बदलत्या तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात भूमिका’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या शिक्षण पध्दतीत 24 तास शिक्षण देण्याची सोय उपलब्ध नाही. मात्र तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे शक्य आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे दर्जेदार शिक्षण स्वस्तात उपलब्ध होत आहे. सध्या मोबाईल हे सर्वाधिक वापरले जाणारे तंत्रज्ञान आहे. अशिक्षित वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणे म्हणजे लोकशिक्षण होय. याच पध्दतीच्या शिक्षणाची मुक्त विद्यापीठाची संकल्पना आहे, असे सांगून मुक्त विद्यापीठाद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी बदलत्या तंत्रज्ञानाविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांना श्री. साळुंखे यांनी सविस्तर उत्तरे दिली.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर,संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) शिवाजी मानकर, उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, डॉ. संभाजी खराट आदींसह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment