मुंबई, दि. 28 : पंतप्रधान पिक विमा योजनेची मुदत वाढवून देण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठविण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधानपरिषदेत दिली.
महाराष्ट्र विधानपरिषद नियम 93 अन्वये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत सूचना मांडली होती. या सूचनेस उत्तर देताना फुंडकर म्हणाले की, खरीप हंगाम 2015 मध्ये राज्यातील एकूण 82.50 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 71.50 लाख शेतकरी योजनेच्या निकषानुसार नुकसान भरपाईस पात्र ठरले असून त्यांना रुपये 4205.05 कोटी नुकसान भरपाई भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत मंजूर झाली आहे. उर्वरित 11 लाख शेतकरी योजनेच्या निकषानुसार भरपाईस पात्र ठरलेले नाहीत.
सद्यस्थितीत मंजूर रुपये 4205.05 कोटी इतक्या नुकसान भरपाईपैकी रु. 3656.43 कोटी इतक्या नुकसान भरपाईचे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप पूर्ण झाले असून उर्वरित रक्कम वाटपाची कार्यवाही सुरु आहे. पंतप्रधान पिक विमा योजनेची मुदत 31 जुलै 2016 रोजी संपत असून राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेत भाग घेता यावा यासाठी या योजनेची मुदत वाढवून मिळण्यासाठी केंद्रास प्रस्ताव सादर करण्यात येईल, असेही श्री. फुंडकर यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment