मुंबई, दि. 27 : राज्यामध्ये मोठ्या यात्रा तसेच भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असणाऱ्या सर्व धर्मिय देवस्थानांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नियमित ऑडिट केले जाईल. पंढरपूर येथे ‘नमामि चंद्रभागा’मोहिमेसाठी प्राधिकरण तयार करण्यात आले असून त्याला लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य बाळासाहेब मुरकूटे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये निर्मल वारीचे यंदा प्रथमच नियोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत 20 हजार शौचालये उपलब्ध करुन देण्यात आले होते. नमामि चंद्रभागा मोहिमेंतर्गत नदीचे पात्र स्वच्छ करण्यात आले आहे. या नदीमध्ये सांडपाणी मिसळले जाते. मात्र ही मोहिम हाती घेतल्याने भुयारी गटार योजनेला प्राधान्य देण्यात आले असून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीदेखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नमामि चंद्रभागा मोहिम पूर्ण झाल्यानंतर नदीचे संपूर्ण पात्र स्वच्छ दिसेल, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ही मोहिम 2022 पर्यंत सुरु राहणार असून चंद्रभागा नदी निर्मल आणि अविरत वाहण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. यासंदर्भात प्राधिकरण तयार करण्यात आले असून त्याला लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात येईल. नमामि चंद्रभागेसाठी निधी कमी पडू देणार नाही.
यंदा वारीसाठी 20 हजार शौचालये उभारण्यात आली होती. पुढच्या वर्षी ही संख्या वाढविण्यात येईल. वारीनंतर पंढरपूर शहरात साफसफाईसाठी1100 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. निर्मल वारीच्या निमित्ताने 800शौचालये वारीमध्ये ठेवण्यात आली होती.
सदस्या प्रणिती शिंदे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, भाविकांची गर्दी होणाऱ्या देवस्थानांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी मोठ्या यात्रा भरतात. भाविकांची गर्दी जास्त असते अशा सर्वधर्मीय देवस्थानांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे ऑडिट नियमितपणे केले जाईल.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गणपतराव देशमुख, अजित पवार, भारत भालके, हरीष पिंपळे, दीपक चव्हाण यांनी भाग घेतला.
No comments:
Post a Comment