डॉ. अनिरुद्ध मालपानी लिखित पुस्तकाचे होणार प्रकाशन
मुंबई / प्रतिनिधी
वैद्यकीय उपचार करताना रुग्ण सुरक्षितता सांभाळून, वैद्यकीय चुका टाळण्याबाबतचे नीतीमूल्य अधोरेखित करण्यासाठी नामवंत वैद्यकीय मंडळींचा सहभाग असलेले चर्चासत्र परळ येथील राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व शेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवार, दिनांक १९ जुलै, २०१६ रोजी दुपारी २ ते ४ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध आय. व्ही. एफ. तज्ज्ञ व वैद्यकीय माहिती निष्णात डॉ. अनिरुद्ध मालपानी लिखित 'पेशंट सेफ्टी - प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम मेडिकल एररस्' या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी बृहन्मुंबई महापालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय व शेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, युनेस्को यांच्याशी संलग्न संयुक्त जैवनीतिमूल्य समितीने आयोजित केलेले हे चर्चासत्र वैद्यकीय महाविद्यालय इमारतीत तळ मजल्यावरील मुख्य सभागृहात पार पडणार आहे. जैवनीतिमूल्य तत्त्वांचे वैद्यकीय शास्त्रात मोठे महत्त्व असून या तत्त्वांची उजळणी करुन रुग्ण सुरक्षेला प्राधान्य देण्याविषयी चर्चासत्रात उहापोह करण्यात येणार आहे.
चर्चासत्राचा विषय 'फर्स्ट, डू नो हार्म' असा असून यामध्ये ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाचे ससन्मान निवृत्त औषधविज्ञान शास्त्र प्राध्यापक डॉ. फारुख उदवाडिया, शेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयाचे ससन्मान निवृत्त प्रसुतिशास्त्र प्राध्यापक डॉ. रुस्तम सुनावाला, के.ई.एम. रुग्णालयातील मज्जातंतू शल्यचिकित्सा विभागाचे माजी प्रमुख प्राध्यापक डॉ. सुनील पंड्या, बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. यशवंत आमडेकर, शेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालयाच्या चिकित्सालयीन औषधशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. उर्मिला थत्ते यांचा सहभाग असणार आहे.
जैवनीतिमूल्य समितीचे सदस्य व सहकारी या चर्चासत्राचे संयोजन करीत आहेत. या चर्चासत्राला आरोग्य व्यवसायातील शिक्षक, विद्यार्थी, परिचारिका शिक्षक, वैद्यकीय मंडळी, जैवनीतिमूल्य समितीचे सदस्य यांची उपस्थिती राहणार आहे.
No comments:
Post a Comment