शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते चार मार्गदर्शिका पुस्तकांचे प्रकाशन
मुंबई,दि. 19: उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व माध्यमिक इयत्ता आठवीच्या पूर्व शिष्यवृत्ती परीक्षाचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत तयार करण्यात आलेल्या मराठी माध्यमातील चार मार्गदर्शिका पुस्तकांचे आज शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे, शिक्षण आयुक्त राजेंद्र गोधणे, सहायक आयुक्त स्मिता गौड,सहायक आयुक्त सुरेश माळी, शिष्यवृत्ती समिती सदस्य जयदास म्हाप्रळकर, पूजा जाधव, मूल्यमापन अधिकारी सुधाकर पाखरे आदी उपस्थित होते.
अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध
उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक पूर्व शिष्यवृत्ती परीक्षेच्या मराठी व गणित विषयाचा पेपर-1 व 2 तसेच इंग्रजी व बुध्दिमत्ता चाचणी विषयाचा पेपर-1 व 2 चा अभ्यासक्रम श्री. तावडे यांच्या हस्ते ऑनलाईन अपलोड करण्यात आला. हा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, ऊर्दु, सिंधी, कन्नड व तेलगू या आठ माध्यमांतून घेण्यात येणार असून सद्यस्थितीत या परीक्षेची मार्गदर्शिका पुस्तिका मराठी माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. ही पुस्तके शिक्षक, विद्यार्थी व पालकांना उपयुक्त ठरणार आहेत. लवकरच इतर माध्यमांतील मार्गदर्शिका पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.
No comments:
Post a Comment