नायर रुग्णालयातील ‘कार्डियाक कॅथलॅब व हृदयरोग अतिदक्षता विभाग’चे लोकार्पण
मुंबई - मुंबईकरांना घड्याळी काट्यावर धावपळ करीत दैनंदिन जीवन जगावे लागते, त्यामुळे त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मुंबईकरांच्या आरोग्य सेवेसाठी प्रथमोपचारापासून सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा बृहन्मुंबई महापालिका उपलब्ध करुन देत आहे. तथापि, मुंबईकरांनी स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे, अशी हृदयस्पर्शी भावना व्यक्त करतानाच सर्व मुंबईकरांना निरोगी आयुष्य लाभावे, अशी सदिच्छा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुंबई सेंट्रल येथील बाई यमुनाबाई लक्ष्मणराव नायर धर्मदाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयातील ‘कार्डियाक कॅथलॅब व हृदयरोग अतिदक्षता विभाग’ चे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईच्या महापौरस्नेहल आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक ८ जुलै, २०१६) करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, नायर रुग्णालयातील अत्याधुनिक कॅथलॅबचे लोकार्पण मी केले असले तरी कुणालाही हृदयरोग होऊ नये आणि हे संयंत्र उपयोगात आणण्याची वेळ येऊ नये, अशीच माझी भावना आहे. मुंबईकरांच्या आरोग्य सेवेसाठी महापालिका अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देते आणि भली मोठी आर्थिक तरतुदही करते. माणसाच्या हृदयातील वाहिन्या स्वच्छ करण्यापासून ते महानगराच्या वाहिन्या असलेल्या नाले व गटारी स्वच्छ करण्यापर्यंत जे परिश्रम महापालिका करते, त्याची दखल घेऊन नंतरच योग्य ठिकाणी टिका व्हावी, अशी भावना व्यक्त केली. तसेच मुंबईकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेने विकास नियोजनात मोकळ्या जागा राखून ठेवाव्यात, तेथे जॉगिंग ट्रॅक बनवावेत, अशी सुचनाही त्यांनी शेवटी केली.
मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर भाषणांत म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांनाच नव्हे तर इतर ठिकाणांहून येणाऱया नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर आरोग्य सेवा पुरविते. फक्त रुग्णालयेच नव्हे तर वैद्यकीय महाविद्यालये, परिचारीका प्रशिक्षण केंद्र, सुपर स्पेशालिटी उपचारांची सुविधा असे वैविध्य या आरोग्य सेवेत आहेत. महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा-सुविधांच्या तरतुदीत वाढ करु, मात्र जनतेवर आरोग्य खर्चाचा बोजा टाकणार नाही, असे महापौरांनी सांगताच टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली. मुंबईकरांच्या आरोग्य सेवेसाठी महापालिका सदैव तत्पर असून या सुविधांमध्ये आणखी वाढ करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या. नायर रुग्णालयातील नवीन सुसज्ज हृदयरोग अतिदक्षता विभाग आणि कॅथलॅबमुळे हृदयरुग्णांना जास्त व अत्याधुनिक सुविधा देणे आता शक्य होणार असून या प्रयत्नांकरीता महापालिका प्रशासन व विभाग प्रमुख डॉ. अजय चौरसिया यांचे महापौरांनी अभिनंदन केले.
या समारंभास उप महापौर अलका केरकर, स्थानिक खासदार अरविंद सावंत, स्थानिक आमदार वारिस युसूफ पठाण, आमदार सुनील शिंदे, आमदार अजय चौधरी, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, महापालिका आयुक्त अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम, बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा यामिनी जाधव, स्थापत्य समिती (शहर) चे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय ए. कुंदन, नगरसेवक अरविंद दुधवडकर, संजय आंबोले, विष्णू गायकवाड, नगरसेविका किशोरी पेडणेकर, हेमांगी चेंबूरकर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुलेमान मर्चंट यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment