मुंबई 2 July 2016 : आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रेस या वास्तू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना केलेल्या आहेत. अशा वास्तूंवर कोणतीही नोटीस न देता मध्यरात्री हातोडा चालवून त्या जमीनदोस्त करायचा प्रयत्न केला गेला. हा प्रकार अतिशय निंदनीय असून, या प्रकरणी संबंधितांना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी मुंबई कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. शनिवारी त्यांनी माजी खासदार एकनाथ गायकवाड व अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत दादर येथील आंबेडकर भवनला भेट दिली; आणि पाडलेल्या भागाची पाहणी करून या घटनेचा निषेध केला.
भाजपाचा आमदार असलेल्या एका धनाढ्य बिल्डरचा या जागेवर डोळा आहे. त्याच्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचे सांगून निरुपम म्हणाले की, ‘हा प्रकार महापालिका आणि प्रशासनाला हाताशी धरून करण्यात येत आहे. त्यामागे एका राजकारणी बिल्डरचा हात आहे. त्याला या जागेवर व्यावसायिक इमारत बांधायची आहे. त्यामुळे मध्यरात्री अडीच वाजता ही वास्तू तोडण्यात आली. आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रेस तोडण्यामागे ज्या लोकांचा हात आहे त्यांना राज्य सरकारने त्वरित अटक करावी. त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे; तसेच ही वास्तू तोडल्यामुळे झालेल्या नुकसानीची संस्थेला भरपाई दिली जावी.
No comments:
Post a Comment