रस्ते घोटाळा प्रकरणात रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या डायरेक्टरला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2016

रस्ते घोटाळा प्रकरणात रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या डायरेक्टरला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : रस्ते घोटाळा प्रकरणात आतापर्यंत २४ जणांना अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ या प्रकरणात पसार असलेल्या सहा कंत्राटदारांपैकी एकाला बुधवारी आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. दीपन प्रवीणचंद्रा शहा असे अटक कंत्राटदाराचे नाव असून, तो रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चरचा डायरेक्टर आहे.

रेलकॉन इन्फ्रास्ट्रक्चर ही खासगी कंपनी असून, २००६ पासून कार्यरत आहेत. दोन ते तीन राज्यांत त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहे. या कंपनीचे शेअर कॅपिटल १५ कोटींच्या घरात आहे. या कंपनीचे पाच डायरेक्टर आहेत. दीपन शहा हे ३ मार्च २००८ पासून या ठिकाणी डायरेक्टर पदावर आहेत. २०१३ साली दीपन शहा यांना मुंबई महापालिकेने तब्बल ६०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे दिली. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी रेलकॉनवर होती. मात्र, मुलुंड आणि पश्चिम उपनगरातील काही रस्ते रेलकॉनमुळे जैसे थे परिस्थितीतच राहिले. या प्रकरणी अनेकदा तक्रार करून देखील दुर्लक्ष झाल्याने या प्रकरणाची चौकशी झाली. या चौकशीत रस्ते घोटाळ्याचे बिंग फुटले. या प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या रेलकॉन कंपनीच्या शहा बरोबरच के. आर. कन्स्ट्रक्शन, आर. के. मदानी कन्स्ट्रक्शन, जे. कुमार. कन्स्ट्रक्शन, आर. पी. शहा कन्स्ट्रक्शन्स आणि महावीर कन्स्ट्रक्शन्सचे संचालकांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत लपून बसलेल्या कंत्राटदारांपैकी दीपन शहा बुधवारी पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करत न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad