मुंबई, दि. १९ : मुंबईतील नद्या, तलाव, नाले यांच्यामध्ये होणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे होणारे प्रदुषण नियंत्रणाखाली आणण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज त्यांच्या मंत्रालयातील दालनात विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये मुंबई आणि परिसरातील नदी, तलाव आणि नाले प्रदुषणमुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. ते आज मंत्रालयातील आयोजित मुंबईतील नदी, नाले, तलावासंदर्भात प्रदुषणाच्या आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी महापौर स्नेहल अंबेकर, आमदार अनिल पटेल, अस्लम शेख, प्रकाश सुर्वे, तुकाराम काते, सुनिल राऊत, उपायुक्त (पर्यावरण) अशोक रवैरे, उपायुक्त रमेश बापके, मा. रा. मराठे, उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटागरे तसेच पर्यावरण तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळ, महानगरपालिका, संबंधित जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
कदम पुढे म्हणाले की, ज्या ज्या भागात प्रदुषित पाणी अथवा परिसर आहे त्या संदर्भातील प्रस्ताव तातडीने सादर करावेत. याच बैठकीत मिठी नदी, दहीसर नदी, पोईसर नदी यांच्यामध्ये होणारा प्रदुषणाचा आढावाही यावेळी घेण्यात आला. दहिसर आणि कुलाबा दरम्यान जे प्रदुषित पाणी सोडले जाते त्यासंदर्भात कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment