मुंबई, दि. 27 : रिओ ऑलिम्पिक 2016 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी ॲथलेटिक ललिता बाबर यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘रन फॉर ललिता’ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार,दि. 31 जुलै, 2016 रोजी दहिवडी, ता. मान, जि. सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्याची माहिती साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून जवळपास 15 हजार 600 खेळाडू सहभाग घेणार आहेत. तसेच या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश फी घेतली जाणार नसून ही स्पर्धा 12 वर्ष, 15 वर्ष, खुला गट, प्रौढ व सेलिब्रिटी या वयोगटात होणार आहे. स्पर्धेचा मार्ग दहिवडी कॉलेज-बस स्टॅण्ड-फलटण चौक-मार्डी चौक-सिध्दनाथ मंदिर-गोंदवले व परत असा आहे.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी माणदेश मॅरेथॉन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे तसेच पदाधिकारी महत्वाचे कार्य करीत आहेत. स्पर्धेच्या शुभारंभासाठी व शुभेच्छा देण्याकरिता विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे, पदुमचे मंत्री महादेव जानकर,कृषी व पणन राज्यमंत्री सदाशीव खोत आदी उपस्थित राहणार आहेत. जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे.
या मॅरेथॉन स्पर्धेसाठी पंचायत समिती माण (दहिवडी) येथील बचत भवन तसेच हुतात्मा परशुराम विद्यालय, वडूज या ठिकाणी नोंदणी केंद्र आहे. तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी www.mandeshmarathon.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment