मुंबई २८ जुलै २०१६ - बृहन्मुंबई महापालिकेच्या 'जी दक्षिण' विभागांतर्गत येणा-या जे. आर.बोरीचा मार्गावरील अनधिकृत झोपड्या हटविण्याची कारवाई २९ जून २०१६ रोजी करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसात सदर ठिकाणी १२५ अनधिकृत झोपड्या पुन्हा उभारण्यात आल्या होत्या. ही बाब लक्षात येताच महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वात आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान पुन्हा तोडण्यात आल्या आहेत.
ऑर्थर रोड कारागृहाजवळील परिसरात असणा-या जे. आर. बोरीच्या मार्गाच्या पदपथावर असणा-या या अनधिकृत झोपड्यांमुळे शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरुन चालत जावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जसा रस्त्यावरील रहदारीचा त्रास होत होता, तसाच रस्त्यावरील रहदारीला व वाहतूकीला देखील पादचा-यांचा त्रास जाणवत होता. मात्र आज दुस-यांदा करण्यात आलेल्या निष्कासनाच्या कारवाईमुळे पायी शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांना मोकळा पदपथ मिळण्यासोबतच रस्त्यावरील वाहतूक देखील अधिक सुलभ व सुकर होण्यासही मदत झाली आहे.
चिंचपोकळी स्टेशन ते संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता चौक)यांना जोडणा-या साने गुरुजी मार्गावर ऑर्थर रोड कारागृह परिसराजवळ जे. आर. बोरीचा मार्ग आहे. या मार्गावर सीताराम मिल स्कूल ही शाळा व बी.डी.डी. चाळी देखील आहेत. याच जे. आर. बोरीचा मार्गावरील पदपथावर असणा-या १२५ अनधिकृत झोपड्या आज तोडण्यात आल्या आहेत. 'जी दक्षिण' विभागाच्या सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वात ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. ना.म.जोशी पोलीस स्टेशनच्या ४० जणांच्या चमूच्या मदतीने महापालिकेच्या २५ जणांच्या चमूने ही कारवाई पूर्ण केली आहे.
No comments:
Post a Comment