५ वर्षात डेंग्यूमध्ये ८ पटीने वाढ
प्रजाचा मुंबई महापालिकेवर ठपका
मुंबई / प्रतिनिधी 7 July 2016
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात गेल्या ५ वर्षात ३३ हजार ४४२ लोकांचा टीबी रोगामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये टीबीमुळे दररोज १९ लोक मृत्यूमुखी पडत आहेत. गेल्या ५ वर्षात डेंग्यूमध्ये ८ पटीने वाढ झाली असून सध्या १५ हजार २४४ केसेस नोंद आहेत. सन २०१४ - १५ ते २०१५ - १६ पर्यंत कॉलराच्या नोंदीमध्ये ७ पटीने वाढ झाली आहे. २०१४ -१५ मध्ये कॉलराचे ३१ रुग्ण होते यात वाढ होऊन सन २०१५ - १६ मध्ये ही संख्या २०७ वर गेल्याचे प्रजा फाउंडेशनने जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेमधून उघड झाले आहे.
प्रजाच्या अहवालानुसार दरवर्षी सरासरी ६६८८ लोक ट्युबरक्युलीसीसमुळे मृत्युमुखी पडतात. जवळपास १ लाख १८ हजार ९३ लोक डायरियाने ट्रस्ट आहेत. डेंग्यूचा आकडा २०११ ते १५ पर्यंत ८११ टक्क्याने वाढला आहे. डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये ६२ पासून १२४ पर्यंत वाढ झाली आहे. शासन जरी विविध कार्यक्रम आणि योजनावर लाखो रुपये खर्च करीत असले तरी प्रजाच्या श्वेतपत्रिकेमधील आकडेवारी नुसार असा कोणताही परिणाम जाणवत नसल्याचे मिलिंद म्हस्के यांनी सांगितले.
प्रजाने चालू वर्षात मुंबईच्या २५ हजार २१५ घरांमध्ये सर्वेक्षण केले होते. पालिका सामाजिक आर्थिक वर्गीकरणाच्या उत्पनाच्या ९ टक्के भाग हॉस्पिटल आणि वैद्यकीय कारणांसाठी खर्च करते. आणि हजारापैकी ४७ घरे खाजगी किंवा चॅरिटेबल क्लिनिक्स हॉस्पिटलचा वापर करतात. यावरून शासकीय हॉस्पिटलवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही असे सांगत शहरात आरोग्य यंत्रणा काम करते आहे का असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला. २०१५ मध्ये महापालिकेने टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूंवर बर्बल ऑप्टोप्सी अभ्यास केला होता. हा अभ्यास अतिशय उथळ पद्धतीने केला गेला होता. महापालिकेने २०१४ मध्ये टीबीमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ७०९० दर्शविला आहे. परंतू टीबी कंट्रोल युनिटने दर्शविलेला आकडा १३५१ इतकाच आहे. या हयगयीबद्दल आरोग्य विभागाने स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असल्याचे म्हस्के म्हणाले.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
सार्वजनिक आरोग्य समितीचे सभासद असलेल्या प्रमोद सावंत, संध्या यादव, तावजी गोरुले, गीता गवळी या चार नगरसेवकांनी २०१५ - १६ मध्ये आरोग्यावर एकही प्रश्न विचारलेला नाही. रमेश लटके, राम कदम, कॅप्टन तामील सेलवन, तृप्ती सावंत या चार आमदारांनी २०१४ च्या हिवाळी अधिवेशनात, २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकही प्रश्न विचारलेला नाही. मुंबईमधून निवडून दिलेले नगरसेवक आमदार नागरिकांच्या आरोग्याबाबत एकही प्रश्न विचारत नसतील, आरोग्याच्या समस्यांबाबत गंभीर नाहीत तर आरोग्याच्या समस्यांना तोंड कसे देणार असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.
No comments:
Post a Comment