नगरसेवकांना आचारसंहिता लागू करण्याचा प्रस्ताव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 July 2016

नगरसेवकांना आचारसंहिता लागू करण्याचा प्रस्ताव

मुंबई: मुंबई महानगरपालिका सभागृहात होणारी शाब्दिक बाचाबाची, हाणामारीला रोखण्यासाठी नगरसेवकांना आचारसंहिता लागू करण्याचा प्रस्ताव खुद्द आयुक्त अजय मेहता यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांपुढे ठेवला आहे़ त्यानुसार बेशिस्त नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढणे तर वेळ पडल्यास त्यांचे पद रद्द करण्याची शिफारसच त्यांनी केली आहे़

पालिका महासभेच्या माध्यमातून नगरसेवकांना नागरी समस्यांवर प्रशासनाला जाब विचारता येत असतो़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिका महासभेतील चर्चेचा स्तर खालावला आहे़ नगरसेवकांमध्ये हाणामारीचे प्रसंग वारंवार घडू लागले आहेत़ देवनार कचरा समस्येवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौर व आयुक्तांच्या दिशेने कचरा भिरकवला़ हा प्रसंग सभागृहात बसलेल्या अन्य सदस्यांसाठी नित्यनेहमाचा असेल़ मात्र आयुक्तांनी याची गंभीर दखल घेऊन नगरसेवकांसाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्धार केला आहे़ बेशिस्त व गैरवर्तणुक करणाऱ्या सदस्याला सभागृहाबाहेर काढण्याचे अधिकार महापौरांना असतात़ मात्र नगरसेवक या कारवाईला जुमानत नसल्याने महापौरांचा अवमान होत आहे़ त्यामुळे पालिका सभागृहातही शिस्तीचे पालन होण्यासाठी आचारसंहितेचा मसुदाही आयुक्तांनी तयार केला आहे़ 
आचारसंहिता अशी असेल 
- निलंबित केल्यानंतरही सदस्य सभागृहाच्या बाहेर जात नसल्यास पीठासीन अधिकारी मार्शल्सची मदत घेऊन नगरसेवकाला बाहेर काढू शकतात़
- बेशिस्तांना इतर समित्यांच्या कामकाजातही भाग घेण्यास प्रतिबंध करण्यात यावा़
- प्रतिस्पर्धी बाकावरील नगरसेवकांना बोलण्याची संधी मिळू नये, यासाठी बऱ्याचवेळा नगरसेवक सभागृहात शिटी आणून वाजवितात़ तर काहीवेळा कचरा आणणे, दूषित पाण्याची बाटली आणणे असे प्रकार घडतात़ सभागृहात अशा कोणत्याही वस्तू आणण्यास बंदी घालण्यात यावी़ तसेच नगरसेवकांच्या तपासणीची प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाला परवानगी द्यावी़
- सभागृहात खणखणारे मोबाईलचे आवाज बंद करण्यासाठी जॅमर बसविण्यात यावे़ तसेच अशोभनीय वर्तणुकीबद्दल संबंधित नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा ठराव पालिका महासभेत मंजूर करुन राज्य शासनाकडे पाठविण्यात यावा़
- सभागृहाची प्रतिष्ठा राखणे व पीठासीन अधिकाऱ्याचा आदर करणार असे शपथपत्रच नगरसेवकांकडून घेणे़

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad