बृहन्मुंबई महानगरपालिका केवळ प्राथमिक नव्हे तर उच्चतम नागरी सेवा-सुविधा देणारी संस्था - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 July 2016

बृहन्मुंबई महानगरपालिका केवळ प्राथमिक नव्हे तर उच्चतम नागरी सेवा-सुविधा देणारी संस्था - महापौर



मुंबई / प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी प्राथमिक सेवा-सुविधा पुरविणे ही असते. यात शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता या बाबींचा प्रामुख्याने समावेश असतो. तथापि, बृहन्मुंबई महानगरपालिका ही शिक्षण, आरोग्य, पाणी, स्वच्छता याबरोबरच अन्य नागरी सेवा-सुविधांबाबतही उच्चतम दर्जेदार सेवा-सुविधा देणारी संस्था असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित मार्च २०१६ मध्ये ‘एस. एस. सी.’ परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सर्वांधिक गुण मिळविलेल्या  शाळेतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचा गुणगौरव सोहळा महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते काल (दिनांक ११ जुलै, २०१६) सायंकाळी शिक्षणाधिकारी कार्यालय, हिंदू कॉलनी, दादर येथे आयोजित करण्यात आला होता, याप्रसंगी महापौर उपस्थितांना संबोधित करताना बोलत होत्या.
यावेळी शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर, उपायुक्त (शिक्षण) रणजित ढाकणे, नगरसेवक अनिल त्र्यंबककर, नगरसेविका वनिता मारुचा, मोरजकर, विश्वनाथ दराडे, शिक्षणाधिकारी महेश पालकर, सर्व उप शिक्षणाधिकारी, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या की, महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या गुणवत्तेचा आलेख विशेष म्हणजे ‘एस. एस. सी.’ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या व गुणवत्ता प्रतिवर्षी वाढत आहे, ही अभिमानाची गोष्ट असून शिक्षण विभागाच्या सर्वोत्कृष्ट कामांची पावती आहे. शालेय गुणवत्तेसोबत  महापालिकेचे विद्यार्थी विशेषतः क्रीडा, नृत्य, संगीत, विविध स्पर्धा यात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन महापालिकेचे नाव रोषण करीत आहेत, ही निश्चितच अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल क्लासरुम, आठवीतील विद्यार्थ्यांना टॅब वितरण, शालेय विद्यार्थ्यांसाठी २७ वस्तुंचे वितरण आणि अन्य सुविधा महापालिका शाळांना पुरवित असते. खासगी शाळांना या बाबी पुरविण्यात येत नाहीत. खासगी शाळांना ज्या सेवा-सुविधा पुरविल्या जात नाहीत, त्या सेवा-सुविधा पुरविण्याचे काम महापालिका करीत असल्याचे त्यांनी सांगितले.                                                       
महापालिकेच्या शिक्षण विभागातील ५ शाळांचा ‘एस. एस. सी.’ मध्ये १०० टक्के निकाल लागला आहे, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांची रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. ३३ विद्यार्थ्यांनी ‘एस. एस. सी.’ मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत, त्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये तर दोन विद्यार्थ्यांना गणितात १०० (पैकीच्या पैकी) गुण मिळाल्याबद्दल त्यांना २१ हजार रुपयांचे  पारितोषिक देऊन महापौरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महापौरांनी या गुणवंत विद्यार्थ्यांची छायाचित्रे शहरातील प्रमुख होर्डिंग्जवर लावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही अपलोड करण्याबाबत आदेशित केले. महापालिका आपले काम चोख बजावित आहे, तेव्हा नागरिकांनीही महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
शिक्षण समितीच्या अध्यक्षा हेमांगी वरळीकर यांनी यावेळी सांगितले की, महापालिकेच्या शिक्षण विभागाची गुणवत्ता व गुणात्मकता या दोन्ही बाबी शिक्षक / मुख्याध्यापक यांनी वाढविण्यासाठी आणखी प्रयत्न करावेत, त्याकरीता प्रशासन व लोकप्रतिनिधी सदैव सहकार्य करेल. शिक्षक, मुख्याध्यापक यांनी हुशार मुलांबरोबर ज्यांची बुद्धिमत्ता कमी आहे, अशा मुलांकडेही तेवढेच लक्ष देऊन महापालिकेच्या गुणवत्तेचा आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. यश मिळविणाऱया विद्यार्थ्यांनी आपले जीवन सार्थकी लागण्यासाठी विशेष मेहनत घेण्याचे आवाहनही वरळीकर यांनी केले.
उपायुक्त (शिक्षण) रणजित ढाकणे यांनी यावेळी सांगितले की, महापालिकेच्या शिक्षण विभागाची गुणवत्ता अधिकाधिक उंचावत असल्याचा प्रत्यय या गुणवत्ता सोहळ्यात स्पष्ट होत असल्याचे दिसते. महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी पुरेसा निधी असतो, तो सार्थकी लागण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. महापालिका शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठय़ा हुद्दांवर असल्याचे आढळून येते. शिक्षण, मुख्याध्यापक यांनी महापालिकेचे नांव आणखी उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ढाकणे यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप शिक्षणाधिकारी गोविंद कुलकर्णी यांनी केले तर, आभार प्रदर्शन उप शिक्षणाधिकारी अर्चना नांदेडकर यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad