मुंबई : मुंबईत विविध प्रकल्प उभारले जात असताना प्रकल्पग्रस्तांना मात्र सोयी सुविधा नसलेल्या व दुरावस्था झालेल्या इमारतींमध्ये राहावे लागत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे घाटकोपर पूर्व येथील रायगड चौक जवळ असलेल्या साई जेठा या सात माळय़ाची प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेली इमारत. या इमारतीमध्ये डॉकयार्ड येथील पडलेल्या इमारतीमधील तसेच इतर ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना घरे देण्यात आली. या इमारतीत बहुतांशी पालिका कर्मचार्यांचे वास्तव असले तरी पालिकेने मात्र इमारतीमधील दुरावस्थेकडे दुर्लक्ष करणेच पसंद केले आहे.
घाटकोपर पूर्व येथील रायगड चौक जवळ असलेल्या साई जेठा या सात माळय़ाच्या इमारतीमधील लिफ्ट गेल्या वर्षभरापासून बंद आहे. याबाबत पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडे तसेच एन विभागाकडे वारंवार तक्रार करूनदेखील कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात आल्या नाही. परिणामी, वृद्ध आणि लहान मुलांना सात माळे पायी चढावे आणि उतरावे लागत आहेत. पालिकेच्या मेहरबानीमुळे या इमारतीमधील अनेक वृद्ध वास्तव्यास आल्यापासून इमारतीच्या खाली उतरले नसल्याची माहिती येथील स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या इमारतीत राहणार्या काही रहिवाशांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत, तर काही वृद्ध आजारपणामुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना उपचारासाठी खाली आणणोदेखील अशक्य होत आहे.
इमारतीच्या आजूबाजूला प्रचंड कचरा साठलेला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये सांडपाणी मिसळत आहे. इमारतीमध्ये राहण्यास आल्यापासून अनेक घरांची छपरे गळत असल्याने ठिकठिकाणी प्लास्टिकचे कागद लावण्याची वेळ येथील रहिवाश्यानावर आलेली आहे. इमारतीची गच्ची विकासकाने अशी बनवली आहे की त्यातून जलवाहिन्यांमध्ये पाणी वाहूनच जात नसल्याने या गच्चीवर पाण्याचे तळे साचल्याने त्यात डास वाढून आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयी सुविधा आणि दुरावस्था झालेल्या इमारती आणि घरांपेक्षा आमची जुनीच घरे चांगली होती अशी प्रतिक्रिया रहिवाश्यानी दिली आहे.
अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू
अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू
प्रकल्पग्रस्तांना तसेच पालिकेच्या कर्मचार्यांची जर अशी अवस्था असेल तर भविष्यात प्रकल्पग्रस्त प्रकल्पांना आपले घर देणार नाही. यामुळे मुंबईचा विकास तर खुंटेल. या घरांमध्ये राहणार्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील उभा राहत आहे. याबाबत आम्ही वारंवार पालिकेच्या संबंधित अधिकार्यांकडे पाठपुरावा करत आहोत. जर या समस्या सोडवल्या गेल्या नाही तर या रहिवाशांना घेऊन अधिकार्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू .
- राखी जाधव (स्थानिक नगरसेविका)
No comments:
Post a Comment